सुभेदार मल्हारराव होळकर - अमृत महाराष्ट्र

सुभेदार मल्हारराव होळकर

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य निष्ठेने वाढवणारे सुभेदार मल्हारराव होळकर यांचा १६ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा थोडक्यात आढावा...

सुभेदार मल्हारराव होळकर मुख्य फोटो
मुख्य फोटो

मल्हारराव होळकर यांचा जन्म महाराष्ट्रात जेजुरीजवळ होळ या गावी १६ मार्च १६९३ रोजी झाला. मल्हारराव लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला. म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले. परंतु होळचे नाव त्यांच्यामागे कायमचे राहिले. 

छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले लढवय्येपणाचे गुण दाखवू लागला. मल्हारराव आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसताना स्वबळावर पुढे येऊन मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते. मल्हाररावांनी दाभाड्यांचे एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करत असताना तरुण बाजीराव पेशव्यांबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर १७२९च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली. 

भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्याशी मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती. राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत ते माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळत होते. गनिमी कावा आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा झाला होता. १७३३ साली चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्या हिच्याशी मल्हाररावांचे पुत्र खंडेराव यांचा विवाह लावून देण्यात आला. १७ मार्च १७५४ रोजी कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले. पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा यशस्वी केल्या. १७५८मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले. यात त्यांना मल्हाररावांनी मदत केली; मात्र मुघल सरदार नजीबाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळे सोडून दिले. त्यांच्या याच कृतीने घात झाला आणि पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. 

मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्थान या दोघांनी गाजवून सोडला. मुघल बादशहाचे सर्व सरदार, वजीर या दोघांना टरकून असायचे. अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता. तिसऱ्या स्वारीनंतर त्याने सफदरजंग या वजीरामार्फत २७ मार्च १७५२ रोजी कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. होळकर-शिंदेंनी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघा प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता. 

पानिपत लढाईच्या पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का त्यांना बसला. मल्हाररावांच्या पहिल्या पत्नी गौतमाबाई २९ सप्टेंबर १७६१ रोजी मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्लामसलत करत असत. स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खासगीची अशा दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या. पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसवण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हाररावांना मृत्यूने गाठले. 

आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांची कारकीर्द पाहिली. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य निष्ठेने वाढवण्याची जबाबदारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढवण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा सिंधू नदीपर्यंत वाढवल्या. अशा या थोर पराक्रमी योद्ध्याला शतश: नमन!


Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 16-03-2026 News publication date | Time: 05:55 AM News publication time | Views: 72 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 16-03-2026 News publication date | Time: 05:55 AM News publication time | Views: 72 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement