विष्णुशास्त्री चिपळूणकर - अमृत महाराष्ट्र

विष्णुशास्त्री चिपळूणकर

आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा १७ मार्च हा स्मृतिदिन.

विष्णुशास्त्री चिपळूणकर मुख्य फोटो
मुख्य फोटो

आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म २० मे १८५० रोजी पुण्यात झाला. त्यांच्या अगोदर आधुनिक मराठी गद्य जवळजवळ अर्ध्या शतकाहून अधिक काळ निर्माण होत होते. परंतु चिपळूणकरांनी त्याला अधिक प्रभावी स्वरूप प्राप्त करून दिले. मुंबई विद्यापीठाची बीए परीक्षा १८७२ साली ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून उत्तीर्ण झाले. त्यानंतर १८७९पर्यंत पुणे व रत्नागिरी येथील सरकारी माध्यमिक शाळांतून त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. 

विष्णुशास्त्र्यांचे वडील कृष्णशास्त्री हे संस्कृतज्ञ, इंग्रजी साहित्याचे जाणकार, रसिक, विद्वान आणि चतुरस्र मराठी लेखक असल्यामुळे विष्णुशास्त्र्यांनाही लेखन-वाचनाची गोडी लागली. कृष्णशास्त्र्यांनी चालवलेल्या 'शालापत्रक' या मासिकातून १८६८मध्ये विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला. त्यानंतर काही वर्षांतच ते या मासिकाचे संपादकही झाले. तथापि त्यांच्या संपादकीय कारकीर्दीत शालापत्रकातून सरकार व ख्रिस्ती मिशनरी यांच्यावर त्यांनी केलेल्या टीकेमुळे १८७५ साली शालापत्रक बंद पडले. सरकारी नोकरीत असतानाच त्यांनी १८७४मध्ये निबंधमाला हे सुप्रसिद्ध मासिक काढले. तसेच ज. बा. मोडक आणि का. ना. साने यांच्या सहकार्याने काव्येतिहाससंग्रह हे मासिक १८७८मध्ये सुरू केले. आपल्या देशातील लोकांनी रचलेली काव्ये, लिहिलेले इतिहास, बखरी असे साहित्य प्रसिद्ध करून त्यामार्गे देशसेवा करणे, हा हे मासिक काढण्यामागील हेतू होता. तरी या मासिकावर विष्णुशास्त्र्यांनी संपादक म्हणून आपले नाव घातले नव्हते. 

नव्या पिढीच्या मनावर देशाभिमानाचे संस्कार करण्यासाठी टिळक-आगरकरांच्या सहकार्याने १८८०मध्ये त्यांनी पुण्यात 'न्यू इंग्लिश स्कूल' ही ख्यातनाम शाळा स्थापन केली. चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना, किताबखाना यांसारखे समाजशिक्षणोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले. निबंधमाला हे विष्णुशास्त्र्यांचे प्रमुख कार्य होते. निबंधमालेच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे ८४ अंकांतील लेखन विष्णुशास्त्र्यांनी जवळजवळ एकट्यानेच केले. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधांनी मराठी निबंधाला सामर्थ्य दिले आणि त्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. 

कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या 'रासेलस' या ग्रंथाचे भाषांतर विष्णुशास्त्र्यांनीच शालापत्रकातून पूर्ण केले. याच मासिकातून कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी या संस्कृत कवींवर त्यांनी जे समीक्षात्मक निबंध लिहिले, ते पुढे संस्कृत कविपंचक या नावाने प्रसिद्ध झाले. या निबंधांनी काव्यसमीक्षेच्या पाश्चात्य दृष्टीला महत्त्व दिले व प्राचीन कवींचा काल, कविता आणि कला यांच्या मीमांसेत ऐतिहासिक दृष्टी वापरली. शालापत्रक, निबंधमाला, केसरी इत्यादी नियतकालिकांतून विष्णुशास्त्र्यांनी जे लेखन केले ते भाषा-साहित्यविषयक, सामाजिक, राजकीय असे विविध प्रकारचे आहे. त्यांच्या भाषा-साहित्यविषयक लेखांत मराठी भाषेची तत्कालीन स्थिती, भाषापद्धती, परभाषेतील शब्दांची योजना, इंग्रजी भाषा, कविता, विद्वत्व आणि कवित्व, ग्रंथांवरील टीका वगैरे विषयांवरील लेखन अंतर्भूत आहे. लोकभ्रम, अनुकरण, गर्व यांसारखे विषय त्यांच्या सामाजिक लेखनात आलेले आहेत. 

'आमच्या देशाची स्थिती' आणि 'मुद्रणस्वातंत्र्यट हे दोन लेख त्यांच्या राजकीय लेखनापैकी विशेष उल्लेखनीय होत. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा यांविषयीचा अभिमान ही त्यांच्या लेखनामागील प्रेरणा होती. या तिन्ही संदर्भांत सामान्यतः उदासीन असलेल्या आणि इंग्रजी राजवटीच्या आहारी जाऊन स्वतःचा देश, त्याने दिलेला सांस्कृतिक वारसा आणि परंपरा यांना कमी लेखणाऱ्या तत्कालीन सुशिक्षितांना जागृत करणे हा त्यांच्या लेखनामागील एक प्रमुख हेतू होता. तो साधण्यासाठी सालंकार, संस्कृत काव्यशैली आणि ॲडिसन, मेकॉले या इंग्रजी निबंधकारांचे डौलदार निबंधलेखन यांच्या संस्कारांतून घडलेली समर्थ आणि प्रभावी गद्यशैली त्यांनी वापरली. स्वमताविषयी जागरूकता आणि परमतखंडनातील धारदार उपहास-उपरोध, सुभाषितांचा मार्मिक उपयोग, पल्लेदार वाक्यरचना ही त्यांच्या शैलीची काही वैशिष्ट्ये. या लेखनाने मराठी गद्याला परिपक्वता आणली. अनेकांना राष्ट्रभक्तीची, इतिहाससंशोधनाची आणि साहित्यसेवेची प्रेरणा दिली. 

१७ मार्च १८८२ रोजी विष्णुशास्त्री यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांना वंदन!

(संदर्भ : मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 17-03-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 42 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 17-03-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 42 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement