शहाजीराजे भोसले - अमृत महाराष्ट्र

शहाजीराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त (१८ मार्च) त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा...

शहाजीराजे भोसले मुख्य फोटो
मुख्य फोटो

शहाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील व निजामशाही-आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार होते. ऐतिहासिक कागदपत्रांत त्यांचा शाहजी किंवा स्याहजी असाही नामोल्लेख आढळतो. भोसले घराण्यातील मालोजी व उमाबाई यांच्या पोटी १८ मार्च १५९४ रोजी शहाजींचा जन्म झाला. शरीफजी हा शहाजींचा धाकटा भाऊ. मालोजी हे निजामशाहीच्या नोकरीतील एक सरदार होते. भोसल्यांकडे हिंगणी, देऊळगाव, बेरडी इत्यादी गावांची पाटीलकी होती. मालोजी १६१०-११ दरम्यान इंदापूर येथे झालेल्या एका लढाईत मारले गेले. तेव्हा निजामशाहीने मालोजींचा ‘मोकासा’ त्यांच्या मुलांना दिला. 

मालोजींचे भाऊ विठोजी यांनी मुलांचे संगोपन केले. पुढे १६२३मध्ये विठोजींच्या मृत्यूनंतर शहाजी स्वतःच मोकाशाचा कारभार पाहू लागले. १६०९मध्ये शहाजींचा पहिला विवाह निजामशाहीतील एक सरदार व सिंदखेडचे पिढीजात देशमुख लखूजी जाधव यांच्या जिजाबाई या कन्येशी झाला. त्यांना सहा अपत्ये झाली. त्यांपैकी संभाजी व शिवाजी वगळता अन्य अपत्ये अल्पायुषी ठरली. संभाजी १६५४ साली कर्नाटकात कनकगिरीच्या लढाईत मरण पावले. तुकाबाई आणि नरसाबाई या शहाजींच्या आणखी दोन बायका. शहाजींचे दुसरे लग्न मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी झाले. त्यांचे पुत्र व्यंकोजीराजे पुढे तंजावरच्या गादीवर आले. शहाजींनी निजामशाहीचा वझीर मलिक अंबर याला सहकार्य करून १६२४मध्ये आदिलशाहीविरुद्धच्या भातवडीच्या लढाईत पराक्रम केला; मात्र त्यात त्यांचे भाऊ शरीफजी धारातीर्थी पडले. त्यानंतर मलिक अंबर आणि शहाजी यांच्या आपापसांतील मतभेदांमुळे शहाजी निजामशाही सोडून आदिलशाहीला मिळाले. परंतु १६२७मध्ये इब्राहिम आदिलशाहच्या मृत्यूनंतर १६२८मध्ये ते पुन्हा निजामशाहीत आले. निजामशाहीत सासरे लखूजी यांचा खून झाल्यानंतर शहाजी काही दिवस चाकण-पुणे परगण्यांत जाऊन राहिले आणि नंतर मुघलांकडे गेले. 

मुघलांनी त्यांना पाच हजारी मनसबदार नेमले. परंतु शाहजहान बादशाहाचा निजामशाही बुडवण्याचा हेतू लक्षात येताच शहाजींनी मुघलांना सोडून निजामशाही कुळातील एका मुलाला गादीवर बसवून १६३२मध्ये पेणगिरीला निजामशाहीची स्वतंत्र सत्ता स्थापन केली. त्यासाठी त्यांनी विजापूरकरांशी मैत्रीचा तह केला. शहाजींनी दक्षिणेत नीरेपासून उत्तरेत चांदवडच्या डोंगरापर्यंतचा प्रदेश आणि पूर्वेला अहिल्यानगरपासून पश्चिमेला उत्तर कोकणापर्यंतचा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. निजामशाही टिकवण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. तथापि शाहजहानने अखेर १६३६मध्ये निजामशाही खालसा केली. त्यानंतर शहाजींनी आदिलशाहीत नोकरी धरली. आदिलशहाने त्यांना ‘सरलष्कर’ व ‘महाराज’ या पदव्या दिल्या. आदिलशहाने त्यांच्याकडे असलेली पुणे-सुपे ही जहागीर तशीच ठेवली. त्यानंतर शहाजींनी प्रदेश विस्ताराचे धोरण अंगीकारून आपले वर्चस्व वाढवले. तेव्हा १६३७मध्ये मुहंमद आदिलशहाने कर्नाटकात जहागीर देऊन तिकडे त्यांची रवानगी केली. 

१६३७ ते १६४८ या काळात कर्नाटकात पेनुकोंडे, बसवपटनम, होस्पेट, बिदनूर, श्रीरंगपटण वगैरे ठिकाणांच्या पाळेगारांविरुद्ध मोहिमा आखून शहाजींनी तो प्रदेश आदिलशाही अमलाखाली आणला. या कामगिरीबद्दल त्यांना बंगलोरची जहागीर देण्यात आली. ते दुसरी पत्नी तुकाबाईंसह बंगलोरला राहू लागले. महाराज फर्जंद शहाजी भोसले या किताबाने आदिलशहाने त्यांचा सन्मान केला. शहाजींचे पुत्र शिवाजी यांच्या स्वराज्यविषयक हालचालींमुळे आदिलशहा, मुघल व शहाजी यांच्यात वितुष्ट आले. शहाजी व शिवाजी यांचा बंदोबस्त करण्याचे नियोजन सुरू झाले. शहाजी जिंजीच्या वेढ्यात गुंतले असता त्यांना २६ जुलै १६४८ रोजी अचानक कैद करण्यात आले. शिवाजी महाराजांनी शाहजहानचा मुलगा मुराद याच्यामार्फत आदिलशहावर दबाव आणून १६ मे १६४९ रोजी शहाजींची सुटका केली. या बदल्यात संभाजींना बंगलोर व शिवाजी महाराजांना कोंडाणा (सिंहगड) आदिलशहाला द्यावे लागले. 

सुटकेनंतर शहाजींकडे पूर्ववत कर्नाटकचा कारभार सोपवण्यात आला. त्यांनी नलेंगापट्टम, पाटॉनोव्हो, तंजावर, वेल्लोर वगैरे गावे हस्तगत करून जणू स्वतंत्र राज्य निर्माण केले होते. कर्नाटकात कोलार, बंगलोर, अर्काट, बाळापूर व शिरे हे भाग त्यांना आदिलशहाकडून जहागीर म्हणून मिळाले. त्यांनी सर्व हिंदू पाळेगारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. मुद्‌गलचा पाळेगार जंजाप्पा नाईक व तंजावरचा जमीनदार पंचीरागू यांचे वैमनस्य होते. जंजाप्पाने शहाजींच्या मदतीने पंचीरागूचा पराभव करून त्याचा प्रदेश काबीज केला; पण पुढे दोघांत वितुष्ट आले. तेव्हा शहाजींनी जंजाप्पाला बाजूला सारून तंजावर व मुद्‌गल येथील कारभार व्यंकोजींच्या स्वाधीन केला. 

अनेक विद्वान, कवी आदी शहाजींच्या आश्रयाला होते. त्यांच्या अंगी पराक्रम, मुत्सद्दीपणा, धाडस आणि हिंमत होती; पण त्यांचे सर्व आयुष्य मुसलमानी सत्ताधाऱ्यांच्या सेवेत गेले. शिमोगा जिल्ह्यातील होदिगेरे येथे शिकारीला गेले असताना घोड्यावरून पडून ते मरण पावले. व्यंकोजींनी होदिगेरे येथे त्यांच्या स्मृत्यर्थ वृंदावन बांधले. शिखर शिंगणापूर येथेही त्यांच्या स्मृत्यर्थ उभारलेले एक प्रतीकात्मक वृंदावन आहे. स्वराज्याचे त्यांचे स्वप्न पुढे त्यांच्या पुत्राने अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण केले. 

(संदर्भ : मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 41 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 41 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement