चैत्र शुद्ध प्रतिपदा ही आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची जन्मतिथी. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांचा जन्म बळिराम व रेवतीबाई या दाम्पत्याच्या पोटी नागपूरमध्ये एक एप्रिल १८८९ या दिवशी झाला. त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा होता. त्यांचे मूळ घराणे आंध्र प्रदेशातील होते. केशवरावांचे पणजोबा नरहरशास्त्री हे अठराव्या शतकात नागपुरात येऊन नागपूरकर भोसल्यांच्या आश्रयाखाली स्थायिक झाले. अध्ययन व अध्यापन ही या घराण्याची परंपरा होती. केशवरावांनी व्यवहारापुरते वेदविद्येचे शिक्षण घेतले होते. त्यांना दोन मोठे बंधू आणि तीन बहिणी होत्या.
गोलबंगला प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना १९०१ साली नील सिटी हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षणासाठी दाखल केले. १९०३ साली त्यांच्या आई-वडिलांचे प्लेगमुळे एकाच दिवशी निधन झाले. घरात पैलवानी परंपरा असल्याने केशवरावांनी त्या विद्येत प्रावीण्य मिळवले होते. इतर अनेक मर्दानी खेळांतही ते प्रवीण होते. वंगभंग चळवळ, स्वदेशी व बहिष्कार आणि 'केसरी'तील स्फूर्तिदायक अग्रलेख यांमुळे ते आणि त्यांचे वर्गमित्र भारावून गेले होते. तेव्हा १९०९ साली ते यवतमाळच्या ‘विद्यागृह’ या राष्ट्रीय शाळेत दाखल झाले; पण ती शाळा सरकारने बंद केली. त्यानंतर ‘द नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन’मधून (बंगाल) ते शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर डॉ. मुंजे यांनी त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी कोलकाता येथे पाठवले. नॅशनल मेडिकल कॉलेजमधून शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी १९१४ साली एलएम अँड एस ही वैद्यकीय पदवी मिळवली आणि त्यासंबंधीचा अनिवार्य प्रायोगिक अभ्यासक्रमही पूर्ण करून १९१५ साली वैद्यकीचे प्रमाणपत्र प्राप्त केले.
विद्यार्थिदशेत असतानाच स्थानिक क्रांतिकारक गटांशी, विशेषतः पुलिन बिहारी दास यांच्या समितीशी त्यांची जवळीक वाढली होती. १९१०च्या जातीय दंगलीत रुग्णशुश्रुषा पथकात व १९१३च्या बंगालच्या महापुराच्या वेळी त्यांनी झटून काम केले. कोलकात्यातील वास्तव्यात अरविंद घोष, श्यामसुंदर चक्रवर्ती या क्रांतिवादी नेत्यांच्या ते संपर्कात आले. शालेय जीवनात इंग्लंडच्या राणीच्या राज्यारोहणाचा सोहळा साजरा होत असताना वाटप झालेली मिठाई भिरकावून देण्याचा बाणेदारपणा, सीताबर्डीच्या किल्ल्यावरचा युनियन जॅक काढून तेथे हिंदुस्थानचा ध्वज फडकवण्याच्या इच्छेने भुयार खणण्याची महत्त्वाकांक्षा अशा घटनांतून त्यांच्या मनात आधीपासूनच असलेली स्वातंत्र्याची सहजस्फूर्त प्रेरणा दित होती. डॉक्टर झाल्यावर जन्मभर अविवाहित राहून देशसेवेचे व्रत पार पाडण्याचा निश्चय करून ते १९१६मध्ये नागपूरला परतले.
नागपूरला प्रांतिक काँग्रेस कमिटी, नागपूर नॅशनल युनियन, राष्ट्रीय मल्लशाळा, अनाथ विद्यार्थी गृह, रायफल असोसिएशन, राष्ट्रीय उत्सव मंडळ आदी संस्थांच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले. १९२० साली नागपूरला काँग्रेसचे अधिवेशन भरणार होते. त्याच्या व्यवस्थेसाठी त्यांनी डॉ. ल. वा. परांजपे यांच्याबरोबर स्वयंसेवक मंडळ उभारले. त्याचे ते कार्यवाह होते. प्रांतिक असहकार समितीचेही ते सदस्य होते. राष्ट्रीय आंदोलनाचा प्रचार करण्यासाठी प्रांतभर संचार करून त्यांनी जहाल भाषणे केली. परिणामी त्यांच्यावर भाषणबंदीचा हुकूम बजावण्यात आला. आधीची दोन भाषणे राजद्रोही आहेत, असा आरोप ठेवून त्यांना १९ ऑगस्ट १९२१ रोजी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिली गेली होती. त्यानंतर ऑगस्ट १९२२मध्ये प्रांतिक काँग्रेसच्या संयुक्त कार्यवाहपदी त्यांची निवड झाली.
जातीय सलोखा आणि परस्पर विश्वास संपादन करण्याच्या उदात्त हेतूने महात्मा गांधीजींनी खिलाफत चळवळीचे नेतृत्व केले. परंतु ते अयशस्वी झाल्यानंतर सर्वत्र भीषण जातीय दंगली उद्भवल्या. मलबार, कोहाट यांसारख्या भागांत हिंदूंच्या कत्तली झाल्या. याची प्रतिक्रिया म्हणून सशस्त्र क्रांतीतील काही नेते जे प्रारंभी काँग्रेसबरोबर होते, ते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांत डॉ. हेडगेवार यांच्यासारखे नेते हिंदूराष्ट्रवादाकडे आकर्षित झाले. जातीय तणावांच्या वेळी बहुसंख्य ठिकाणी आक्रमक पवित्रे घेणाऱ्या मुस्लिम शक्तींपुढे सदैव भीतिग्रस्त राहणाऱ्या असंघटित हिंदूंमध्ये स्वसंरक्षणाचे सामर्थ्य निर्माण करण्याची त्यांना आवश्यकता वाटू लागली. विविध संस्थांमध्ये काम करत असताना त्यांनी अनुभवांच्या आधारे विश्लेषणात्मक चिंतन केले. हे करत असताना त्यांच्या लक्षात आले, की पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशभक्तीचे संस्कार समाजावर झाले नाहीत तर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेने ग्रासलेला समाज देशाचा, समाजाचा विचार न करता स्वार्थाने झपाटून देशापुढे अनेक संकटे उभी करील.
यातून मार्ग काढण्यासाठी समाजाकरिता आणि देशासाठी समर्पित राहण्याचा संस्कार करून त्या धाग्याने संघटन उभे करण्याचा निश्चय त्यांनी केला. यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उदय झाला. राष्ट्रनिष्ठेचे हे संस्कार किशोरवयात, बालवयातच अधिक प्रभावीपणे करता येतील हे लक्षात घेऊन काही किशोरवयीन मुलांना एकत्रित करून १९२५च्या विजयादशमीला नागपूरच्या मोहितेवाड्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनेचा संकल्प करून स्थापना करणे तुलनेने सोपे होते; मात्र अशी संघटना निर्दोषपणे पुढे जाईल अशी कार्यपद्धती विकसित करणे हे मोठे अवघड काम होते. डॉ. हेडगेवारांचे मोठेपण, संघटनकौशल्य त्यामध्ये दिसून येते. डॉ. हेडगेवारांनी संघ स्थापन केला, तरी काँग्रेस सोडली नव्हती. ते काँग्रेसच्या सर्व चळवळींत भाग घेत. लाहोर काँग्रेसच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावाने त्यांना अत्यानंद झाला. २६ जानेवारी १९३० रोजी संघाच्या प्रत्येक शाखेने काँग्रेसचे अभिनंदन करण्यासाठी सभा आयोजित कराव्यात, असा आदेश त्यांनी संघशाखांना दिला. नंतर डॉ. परांजपे यांच्या हाती सरसंघचालकपदाची सूत्रे देऊन त्यांनी स्वतः २२ जुलै १९३० रोजी सत्याग्रहात भाग घेतला. त्याबद्दल त्यांना अटक झाली. फेब्रुवारी १९३१मध्ये त्यांची सुटका झाली.
ऑगस्ट १९३६मध्ये त्यांनी संघाच्या धर्तीवर कार्य करणारी महिलांसाठीची राष्ट्रसेविका समिती सुरू करण्यास लक्ष्मीबाई केळकर (मावशी) यांना मान्यता दिली. डॉ. हेडगेवारांनी १३ मे १९३७ रोजी पुण्यातील सोन्या मारुती सत्याग्रहात भाग घेतला. २१ जून १९३७ रोजी भोसला मिलिटरी स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी ते नाशिकला उपस्थित होते. त्यांनी १९३८ साली पुण्यातील हिंदू युवक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले. १९३२पासून डॉ. हेडगेवारांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. प्रांताप्रांतांचा दौरा, जिल्ह्यांना भेटी, अधिकारी प्रशिक्षण वर्ग इत्यादी कार्यक्रम त्यांनी प्रकृती बरी नसतानाही चालूच ठेवले. त्यामुळे दीर्घ औषधोपचार होऊ शकले नाहीत. अखेर २१ जून १९४० रोजी नागपूर येथे त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी माधवराव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांना संघाची धुरा सांभाळण्यासाठी सरसंघचालक म्हणून नेमले.
डॉ. हेडगेवारांनी संघकार्याची रचना कौटुंबिक मूल्यांवर केली. संघ हे आपले कुटुंब आहे आणि आपण कुटुंबात जसा व्यवहार करतो, तसाच संघात केला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी लोकशाही, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था यांविषयी मूलभूत चिंतन मांडलेले नाही तथापि कोणतीही व्यवस्था उत्तम रीतीने चालवण्यासाठी काय केले पाहिजे, याचा जो मार्ग सांगितला आहे, त्याला तोड नाही. माणसाला संस्कारित केल्याशिवाय व स्वबांधवांविषयी त्याच्या मनात आपुलकीची आणि कर्तव्याची भावना निर्माण केल्याशिवाय कोणतीही व्यवस्था कल्याणकारी ठरणार नाही, असे त्यांचे मत होते. अनेक जण नेहमी दाण्याचे उदाहरण देतात. एक दाणा जमिनीत स्वत:ला गाडून घेतो तेव्हा अनेक दाण्यांचे कणीस उभे राहाते. डॉक्टरांनी स्वतःला अक्षरश: गाडून घेणारी माणसे तयार केली आणि त्या माणसांनी एकेका प्रांतात संघाचे भरीव काम उभे केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आज इतकी वर्षे झाली, तरीही देशभक्तीची भावना प्रबळ नसल्याने सर्व क्षेत्रांत समस्या असल्याची जाणीव सर्व स्तरांवर होते आहे. देशभक्तीचे संस्कार आणि त्या संस्कारांच्या प्रभावाने काम करण्याची गरज स्वातंत्र्याच्या २५ वर्षे आधी ज्यांनी ओळखली होती, त्या डॉ. हेडगेवारांचे द्रष्टेपण मान्यच करावे लागेल. देशासाठी तळहातावर शिर घेऊन मरावे कसे, हे दाखवून देण्याच्या काळात देशासाठी शांतपणे आणि संपूर्ण समर्पित भावनेने जगावे कसे, याचा संस्कार समाजावर करण्याचा विचार करणारे डॉ. हेडगेवार यांचे वेगळेपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच डॉ. हेडगेवार हे नव्या हिंदूराष्ट्रवादाचे जनक आणि सुप्त हिंदूराष्ट्राचे प्रबोधक मानले जातात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना हिंदूराष्ट्रवादाचा आधारस्तंभ म्हटले आहे.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment