बा. सी. मर्ढेकर - अमृत महाराष्ट्र

बा. सी. मर्ढेकर

युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त (२० मार्च) त्यांचा अल्प परिचय...

बा. सी. मर्ढेकर मुख्य फोटो
मुख्य फोटो

बा. सी. म्हणजेच बाळ सीताराम मर्ढेकर हे मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी, तसेच नवकविता व नवटीका या प्रकारांचा प्रारंभ करणारे श्रेष्ठ साहित्यिक होते. त्यांचा जन्म एक डिसेंबर १९०९ रोजी सातारा जिल्ह्यातील मर्ढे या गावी झाला. त्यांचे कुटुंब परंपरेने रामदासी पंथाचे होते. त्यांचे वडील आरंभी शिक्षक होते. पुढे ते शिक्षण क्षेत्रातील एक अधिकारी झाले. बाळ यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण खानदेशात धुळे येथे झाले. नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बीए झाले. १९२९ साली आयसीएस होण्यासाठी ते इंग्लंडला गेले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. 

इंग्लंडमधील वास्तव्यात तेथील वाङ्मयीन चळवळींचा त्यांनी अभ्यास केला. टी. एस. एलियट, जेम्स जॉइस, व्हर्जिनिया वूल्फ यांच्यासारख्या श्रेष्ठ साहित्यिकांचा, तसेच क्लाइव्ह बेल, रॉजर फ्राय, हर्बर्ट रीड यांच्यासारख्या समीक्षकांचा त्यांच्या साहित्य अभिरुचीवर आणि आकलनावर प्रभाव पडला होता. लंडनच्या किंग्ज कॉलेजात शिकत असताना प्राध्यापक जेम्स सदरलंड यांच्या विचारांचा प्रभावही त्यांच्यावर पडला. १९३२मध्ये ते भारतात परतले. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाचे सहसंपादक म्हणून, तसेच धारवाड, मुंबई, अहमदाबाद येथील सरकारी महाविद्यालयांतील प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. परंतु त्यात ते रमले नाहीत. १९३८ साली त्यांनी ऑल इंडिया रेडिओत नोकरी पत्करली आणि अखेरपर्यंत ते त्या नोकरीत राहिले. 

बा. सी. मर्ढेकर यांच्या काही प्रसिद्ध साहित्यकृती म्हणजे - 

कविता - शिशिरागम (१९३९), काही कविता (१९४७), आणखी काही कविता (१९५१)

कादंबऱ्‍या - रात्रीचा दिवस (१९४२), तांबडी माती (१९४३), पाणी (१९४८)

नाटक - नटश्रेष्ठ (१९४४)

संगीतिका - कर्ण (१९४४), संगम (१९४५), औक्षण (१९४६), बदकांचे गुपित (१९४७)

समीक्षात्मक आणि सौंदर्यशास्त्रीय - आर्ट्‌स अँड मॅन (१९३७), वाङ्मयीन महात्मता (१९४१), टू लेक्चर्स ऑन अ‍ॅन इंस्थेटिक ऑफ लिटरेचर (१९४१), सौंदर्य आणि साहित्य (१९५५). 


मर्ढेकरांची कविता ही नवकविता किंवा नवकाव्य म्हणून ओळखली जात असली, तरी पूर्वपरंपरेशी तिचे अतूट नाते आहे. ओवी-अभंग लिहिणार्‍या संतांच्या मनोभूमिकेशी मर्ढेकरांची स्वतःची भूमिकाही अनेक ठिकाणी जुळते. संतकवितेतून प्रत्ययाला येणारी ईश्वरनिष्ठा, पारलौकिक स्पर्शाची ओढ आणि गूढ उदात्तता ही सर्व वैशिष्ट्ये यंत्रयुगातील आणि युद्धोत्तर जगातील भेदक वास्तवाचे दर्शन घडवून मानवी जीवनाच्या अर्थशून्यतेची प्रचिती देणार्‍या मर्ढेकरांच्या कवितेतही आढळतात.

कवितेप्रमाणे कादंबरीच्या क्षेत्रातही मर्ढेकरांनी नवे प्रयोग केले. समीक्षेच्या क्षेत्रातील मर्ढेकरांची कामगिरी संस्मरणीय ठरली. सौंदर्यशास्त्रीय विचारांमध्ये कलेतील माध्यमाच्या विचारापासून कलेतील साधनाचे स्वतंत्र स्थान स्पष्ट करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. समीक्षेच्या क्षेत्रातील मर्ढेकरांची कामगिरी संस्मरणीय ठरली. संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्य यांसारख्या ललित कलांसारखीच साहित्य हीसुद्धा एक ललित कला असल्यामुळे साहित्यनिर्मितीत साहित्यसमीक्षा ही सौंदर्यशास्त्राच्या आधारे व्हायला पाहिजे. इंद्रियसंवेदनांची लयबद्ध रचना म्हणजे कलाकृती म्हणूनच कलात्मक साहित्यात घाटाला महत्त्व अशी त्यांची भूमिका होती. संवाद, विरोध व समतोल ही सुंदर घाट उत्पन्न करणारी तत्त्वे मर्ढेकरांनी मांडली. मराठीतील खूपसे वाङ्मय हिणकस आहे असे मर्ढेकरांना वाटे आणि ते तसे का आहे, याचे विवेचन त्यांनी वाङ्मयीन महात्मता या ग्रंथात केले आहे. केवळ इंग्रजी साहित्याच्या ओंजळीने पाणी प्यायल्यास मराठी साहित्याची गुणवत्ता आणखी खालावत जाईल, ही महत्त्वाची जाण त्यांनी साहित्यिकांमध्ये उत्पन्न केली. अशा या युगप्रवर्तक कवीचे २० मार्च १९५६ रोजी निधन झाले.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 20-03-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 20-03-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement