कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांच्या (२१ मार्च) स्मृतिदिनानिमित्त त्यांचा अल्प परिचय...
यशवंत रामकृष्ण दाते हे श्रेष्ठ मराठी कोशकार होते. १७ एप्रिल १८९१ रोजी रत्नागिरी जिल्यातील किन्हळ येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण धुळे, पुणे आणि नागपूर येथे झाले. बीए, एलएलबी झाल्यानंतर १९१९मध्ये डॉ. केतकर यांच्या ज्ञानकोश मंडळात काम करण्यासाठी ते पुण्यात आले. त्यानंतर काही काळ याच मंडळाच्या ‘विद्यासेवक’ या मासिकाचे ते संपादक होते. ज्ञानकोश मंडळातील काम चालू असतानाच पुणे येथील सरस्वती मंदिर या शिक्षणसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला.
१९२८मध्ये ज्ञानकोश मंडळातून निवृत्त झाल्यावर त्यांनी महाराष्ट्र कोशमंडळाची त्यांनी स्थापना केली. डॉ. केतकरांसारख्या महापंडितांबरोबर अनेक वर्षे काम केल्यामुळे दाते यांना कोशरचनेच्या पद्धतशीर कामाचा अनुभव लाभला. त्याला त्यांनी अखंड परिश्रमांची जोड दिल्यामुळे आणि चिं. ग. कर्वे यांच्यासारखे समान विचारांचे जोडीदार लाभल्यामुळे दाते यांच्या हातून अनेक प्रकारचे कोश तयार झाले आणि मराठी भाषेचे हे दालन समृद्ध झाले. मराठीतील बहुतांश शब्दांचा समावेश असल्यामुळे समाधानकारक ठरलेला दाते–कर्वे यांचा महाराष्ट्र शब्दकोश १९३२–३८ या कालावधीत एकूण सात खंडांत प्रसिद्ध झाला. त्याचा पुरवणी खंड १९५०मध्ये प्रसिद्ध झाला.
कर्वे यांच्या साह्याने तयार केलेला सुलभ विश्वकोश १९४९–५१ या कालावधीत सहा भागांत प्रसिद्ध झाला. महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (दोन खंड, १९४२ आणि १९४७) आणि शास्त्रीय परिभाषा कोश (१९४८) ही याच दोघांनी निर्माण केलेली कोशसंपदा होय. दाते यांनी रा. त्र्यं. देशमुख यांच्या सहकार्याने १८१० ते १९१७ या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी मासिकांची, त्यांतील लेखांची, तसेच मराठी ग्रंथांची आणि ग्रंथकारनामांची सूची महाराष्ट्रीय वाङ्मयसूची (१९१९) या नावाने तयार केली. चिं. ग. कर्वे यांच्या सहकार्याने डॉ. केतकरांचे सान्निध्य (१९४६) हे केतकरांचे गुणदोषविवेचक अल्पचरित्रही त्यांनी लिहिले आहे. यांखेरीज पिता–पुत्र संबंध (१९४३) हे एक सामाजिक स्वरूपाचे लेखन दाते यांनी केलेले आहे. आयुष्याच्या अखेरीस त्यांनी संक्षिप्त शब्दकोशाचे काम हाती घेतले होते; पण ते अपूर्ण राहिले.
कोशरचनेसारखे चिकाटीचे व अभ्यासकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे कार्य सातत्याने करत राहून दाते यांनी मराठी भाषेची बहुमोल सेवा केली आहे. सोलापूरमध्ये १९४१ साली भरलेल्या मुद्रक संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भाषाशास्त्रातील विद्वत्तेमुळे भारतीय राज्यघटनेचे हिंदी व मराठी अनुवाद करण्यासाठी नेमलेल्या समित्यांचे सभासद म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळाचे ते अध्यक्ष होते. २१ मार्च १९७३ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. अशा या थोर कोशकाराला वंदन!
(संदर्भ : मराठी विश्वकोश - प्रथम आवृत्ती)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment