मधुसूदन कालेलकर - अमृत महाराष्ट्र

मधुसूदन कालेलकर

मराठी नाटककार, कथाकार, कवी, गीतकार आणि पटकथाकार यांच्या जन्मदिनानिमित्त (२२ मार्च) त्यांचा अल्प परिचय...

मधुसूदन कालेलकर मुख्य फोटो
मुख्य फोटो

मधुसूदन कालेलकर हे मराठी नाटककार, कथाकार, कवी, गीतकार आणि पटकथाकार होते. त्यांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी वेंगुर्ले येथे झाला. शालेय शिक्षण वेंगुर्ल्यात झाल्यावर ते मुंबईत आले. सुरुवातीला ते गिरगावात राहण्यास आले. तिथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचे पहिले नाटक लिहिले आणि आपल्या लेखनाचा श्रीगणेशा केला. कालेलकरांनी एकूण २९ नाटके आणि मराठी व हिंदी मिळून १११ चित्रपटांसाठी लेखन केले. त्यात त्यांनी कौटुंबिक, गंभीर, विनोदी, सामाजिक असे अनेक विषय हाताळले आहेत. बात एक रात की,' 'ब्लफ मास्टर,' 'झुमरू,' 'फरार,' 'दुल्हन वही जो पिया मन भाये,' 'अखियों के झरोखों से,' 'गीत गाता चल,' हे त्यांचे काही प्रमुख हिंदी चित्रपट. 

त्यांनी चार नाटकांची निर्मिती केली. त्यांच्या अनेक नाटकांचे गुजराती भाषेत प्रयोग झाले, तर तीन ते चार नाटकांवर हिंदी व मराठीत चित्रपटही झाले आहेत. 'आम्ही जातो आमुच्या गावा', 'पाहू रे किती वाट', 'अपराध', 'जावई विकत घेणे आहे' , 'अनोळखी', 'गुपचूप गुपचूप' हे त्यांचे चित्रपट. तसेच 'बाळा गाऊ कशी अंगाई' या चित्रपटातील 'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई' या अंगाई म्हणून घरांघरांत सुपरिचित असलेल्या गीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीतलेखनाचे पारितोषिक मिळाले. त्यांच्या 'अपराध मीच केला,' 'सागरा प्राण तळमळला' व 'शिकार' या नाटकांना महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृतीचे पारितोषिक मिळाले. 'हा माझा मार्ग एकला' या त्यांनी लिहिलेल्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. या व्यतिरिक्त त्यांना तीन वेळा रसरंग फाळके गौरवचिन्ह पुरस्कार देण्यात आला आहे. 

१९६४-६५ साली मराठी चित्रपटांसाठीचा दुहेरी पुरस्कार, १९७०मध्ये 'अपराध,' १९७४ला 'जावई विकत घेणे आहे,' 'अनोळखी,' 'गुपचूप गुपचूप,' 'बाळा गाऊ कशी अंगाई' असे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात त्यांना एकूण नऊ वेळा सर्वोत्तम कथा, पटकथा व संवाद यांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. १९७८मध्ये सर्वोत्तम पटकथालेखनाचा फिल्मफेअर पुरस्कार, 'निंबोणीच्या झाडामागेट या अंगाईगीताला गीतलेखनाचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. 'अ, आ आई, म म मका' (एक धागा सुखाचा), 'सुख आले माझ्या दारी' (आलिया भोगासी), 'सूर तेच छेडिता,' 'सांग कधी कळणार तुला' (अपराध), 'तू सुखकर्ता तू दुःखहर्ता' (अष्टविनायक) ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. एक एक चित्रपट कालेलकर अक्षरश: दोन ते चार तासांत लिहून पूर्ण करत आणि हे लेखन एकटाकी असे. कुठेही खाडाखोड नसलेले ते लेखन वाचताना वाचणारा अचंबित होई. कुठल्या वाक्याला टाळ्या पडतील हेसुद्धा ते अचूक सांगत असत. अशा या प्रतिभाशाली लेखकाचे १७ डिसेंबर १९८५ रोजी निधन झाले. 

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 22-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 35 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 22-03-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 35 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement