१९ डिसेंबर हा गोवा राज्याचा मुक्ती दिन. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या या देशातील चिमुकल्या राज्याच्या स्वातंत्र्याचा इतिहास रोचक आहे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीरपासून ते हैदराबादपर्यंतची अनेक संस्थानेसुद्धा भारतात सामील झाली; पण गोवा, दीव, दमण हे भारताच्या स्वातंत्र्यानंतरदेखील पोर्तुगीजांच्या अमलाखालीच होते. गोवा आणि महाराष्ट्रातील आंदोलकांच्या अथक चळवळींमुळे १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवामुक्तीचे स्वप्न सत्यात उतरले. गोव्याच्या पोर्तुगीजांपासूनच्या मुक्तीसाठी शेकडो लढाऊ स्त्री-पुरुष सत्याग्रहींना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.
तब्बल ४५० वर्षे गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. ४५० वर्षांपूर्वी पोर्तुगालचा अल्फान्सो आल्बुकर्क याने गोव्यात प्रवेश केला. त्या वेळी त्या ठिकाणी आदिलशहाची हुकूमत होती. तब्बल सहा हजार मुसलमानांची हत्या करून अल्फान्सो आल्बुकर्कने गोव्यावर कब्जा केला होता. पोर्तुगीजांना गोव्यात त्यांचे राज्य, धर्म आणि व्यापारउदीम वाढवायचा होता. धर्मांतराची जबरदस्ती, जुलमी अत्याचाराच्या मार्गे पोर्तुगीजांनी गोव्यात आपले बस्तान बसवले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय जनतेची इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्ती झाली; पण गोव्याची जनता मात्र हालअपेष्टांचे जगणे जगत होती. पोर्तुगीजांच्या जोखडातून गोव्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी भूमिगत राहून चळवळ सुरू केली. पोर्तुगीजांची सत्ता, तसेच सालाझारच्या हुकूमशाहीला टक्कर देण्यासाठी गोमंतकीय मातीतील नवीन पिढी सज्ज झाली. यामध्ये प्रभाकर सिनारी, मनोहर आपटे उर्फ मोहन रानडे, बाळा मापारी, विश्वनाथ लवंदे यांसारख्या सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारणार्या आंदोलकांसह गावातील अनेक तरुण पुढे आले. त्यांनी आझाद गोमंतक दलसारख्या सशस्त्र दलाची स्थापना केली. पुढील काळात पुरुषोत्तम काकोडकर, डॉ. टी. बी. कुन्हा, डॉ. ज्युलिओ मिझेनीस, टेलो द मास्कारेन्हस आदींनी सत्याग्रहाच्या माध्यमातून गोवा मुक्तिसंग्रामात सहभाग घेतला. डॉ. टी. बी. कुन्हा हे गोव्यातील राष्ट्रवादी चळवळीचे जनक होते.
गोवा मुक्तिसंग्रामात महाराष्ट्रानेसुद्धा मोलाची साथ दिली. यामध्ये एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, पीटर अल्वारीस, पं. महादेवशास्त्री जोशी, केशवराव जेधे, मधू दंडवते, जयंतराव टिळक, वसंतराव तुळपुळे,आचार्य अत्रे यांचा सहभाग होता. संगीतकार सुधीर फडके हेदेखील गोवा मुक्तिसंग्रामात हिरीरीने सहभागी झाले होते. पुरुषांप्रमाणेच महिलासुद्धा आघाडीवर होत्या. शेकडो महिला कार्यकर्त्या या संग्रामात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सुधा जोशी, सिंधूताई देशपांडे, कमलाबाई भागवत, कमला उपासनी, प्रभा साठे या महिला गोवा मुक्तिसंग्रामाच्या अग्रभागी होत्या. केशव गोरे, हिरवे गुरुजी यांच्या बरोबर कमल उपासनी, प्रभा साठे, शांता राव या महिला कार्यकर्त्या पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात हुतात्मा झाल्या. १९५८च्या आसपास पोर्तुगीज वसाहतवाद लवकरात लवकर नामशेष व्हावा हा मतप्रवाह जोर धरू लागला. त्याच काळात दिल्ली येथे गोमंतकीय सर्वपक्षीय बैठक पार पडली. यामध्ये पोर्तुगीजांच्या विरुद्ध लष्करी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली; पण या मागणीवर एकमत मात्र होत नव्हते. दरम्यान कोणत्याही क्षणी भारतीय लष्कर गोव्यात प्रवेश करेल याची कुणकुण पोर्तुगीजांना लागली होती. म्हणूनच पणजी, मडगाव, म्हापसा या प्रमुख शहरांमध्ये पोर्तुगीजांनी संचारबंदी घोषित केली. अखेर १८ डिसेंबर १९६१ रोजी भारत सरकारने लष्कराला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गोव्याच्या सीमांचा ताबा घेण्यात आला. या वेळी पोर्तुगालने ब्रिटन, अमेरिका यासारख्या मित्र देशांकडे मदत मागितली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू भक्कम असल्याने मित्र देशांनी पोर्तुगीजांना मदत केली नाही.
गोव्याच्या सीमा ताब्यात घेऊन भारतीय सैन्याने, तसेच स्वातंत्र्यसैनिकांनी पोर्तुगीजांची कोंडी केली होती. दरम्यान पत्रादेवी या ठिकाणी पोर्तुगीज सैन्याने भारतीय स्वातंत्र्यसैनिकांवर गोळीबार केला. यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक धारातीर्थी पडले. अखेर १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीज गव्हर्नर वासाल द सिल्वा याने शरणागती पत्करली.
(संकलित माहिती)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment