हुतात्मा दिनाच्या निमित्ताने (२३ मार्च) क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या क्रांतिकार्याचा आढावा..
'देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो...' हा विचार क्रांतिसूर्य विनायक दामोदर सावरकर यांनी मांडला. आपली मातृभूमी, आपला देश हाच देव मानून अनेक अनाम वीरांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले. वय, जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद न ठेवता फक्त आणि फक्त देशासाठी लढले. ज्या वयात भविष्याची स्वप्ने पाहायची, त्या वयात या वीरांनी देशासाठी आपले प्राण त्यागले. आपल्या या बलिदानाने देश स्वतंत्र होईल का, आपले बलिदान व्यर्थ जाणार नाही ना, अशा कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता त्यांनी त्यांचे कर्तव्य केले. असेच थोर वीर म्हणजे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव.
२३ मार्च १९३१ रोजी महान क्रांतिकारक भगतसिंग आणि त्यांचे साथीदार राजगुरू आणि सुखदेव यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. त्यांच्या हौतात्म्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक नवीन ऊर्जा व दिशा मिळाली. त्यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ हुतात्मा दिन पाळला जातो.
भगतसिंग यांचे काका सरदार अजितसिंग, तसेच त्यांचे वडील हे दोघेही महान स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे भगतसिंग देशभक्तीच्या वातावरणात वाढले. लहान वयातच भगतसिंग यांनी ब्रिटिश साम्राज्याला मुळापासून उखडून टाकण्याचे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली. वयाच्या १९व्या वर्षी फाशी दिलेले कर्तारसिंग सराभा त्यांचे नायक बनले. १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बाग येथे झालेल्या हत्याकांडानंतर ते अमृतसरला गेले होते. तेथील विदारक दृश्य पाहून ते अतिशय क्रुद्ध झाले. अशातच त्यांची भेट झाली त्यांच्याच विचारांच्या सुखदेव आणि राजगुरू यांच्याशी! भगतसिंग यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या मदतीने हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची (एचएसआरए) स्थापना केली. या भारतीय क्रांतिकारक चळवळीचे ध्येय आता भारताला स्वतंत्र करून एक बलशाली भारत उभे करण्याचे होते.
१७ नोव्हेंबर १९२८ रोजी लाहोरमध्ये एका ब्रिटिशविरोधी मिरवणुकीत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लाला लजपतराय यांचा पोलिसांच्या क्रूर हल्ल्यात मृत्यू झाला. या हत्येसाठी जबाबदार असलेले ब्रिटिश अधिकारी डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल स्कॉट यांना गोळ्या घालून लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा भगतसिंगांनी निश्चय केला होता; मात्र स्कॉट समजून त्याने चुकून असिस्टंट सुपरिटेंडंट सॉन्डर्स यांना गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर ते लाहोरमधून कोलकात्याला आणि तिथून आग्रा येथे नाट्यमयरीत्या निसटले. तिथे त्यांनी बॉम्ब बनवण्याचा कारखाना उभारला. ब्रिटिश सरकारने या कृत्याला प्रत्युत्तर म्हणून 'ट्रेड्स डिस्प्युट्स बिल'सारखे कठोर उपाय योजले. हे विधेयक मंजूर झाल्याच्या निषेधार्थच त्याने विधानसभेचे अधिवेशन चालू असताना सेंट्रल असेंब्ली हॉलमध्ये बॉम्ब फेकले. बॉम्बमुळे कोणालाही इजा झाली नाही; पण त्याचा आवाज इतका मोठा होता, की तो एका गुलाम राष्ट्राला दीर्घ निद्रेतून जागे करण्यासाठी पुरेसा होता. बॉम्ब फेकल्यानंतर भगतसिंग आणि त्याच्या मित्राने घटनास्थळावरून पळून जाण्यास नकार देऊन जाणीवपूर्वक अटक करवून घेतली. खटल्याच्या सुनावणीदरम्यान भगतसिंगांनी कोणताही बचाव वकील नेमण्यास नकार दिला. प्रचंड जनदबाव आणि भारतातील राजकीय नेत्यांच्या असंख्य आवाहनांनंतरही भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि २३ मार्च १९३१ रोजी पहाटेच्या वेळी त्यांना फाशी देण्यात आली. फिरोजपूरमध्ये सतलज नदीच्या काठावर त्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी भगतसिंग फक्त २३ वर्षांचे होते. एक काळ असा होता, की त्या तरुण क्रांतिकारकाच्या नावाच्या नुसत्या उल्लेखानेच बहुतांश भारतीयांच्या भावना उफाळून येत असत.
भगतसिंग यांना या कार्यात साथ देणाऱ्या दोन वीरांचाही परिचय आपण करून घेऊ या. त्यातील एक वीर म्हणजे सुखदेव थापर. हे पंजाबमधील क्रांतिकारक होते. ते एचएसआरएचे एक सक्रिय सदस्य आणि सर्वांत ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. भारताच्या भूतकाळाचा अभ्यास करण्यासाठी, तसेच जगातील क्रांतिकारक साहित्याच्या सूक्ष्म पैलूंचे परीक्षण करण्यासाठी त्यांनी नॅशनल कॉलेज (लाहोर) येथे अभ्यास मंडळे सुरू केली, असे म्हटले जाते. भगतसिंग आणि इतरांसोबत त्यांनी लाहोरमध्ये 'नौजवान भारत सभा' सुरू केली. स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना सक्रिय करणे, त्यांच्यात विवेकी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, जातीयवादाशी लढा देणे आणि अस्पृश्यतेची प्रथा संपुष्टात आणणे ही या संघटनेची मुख्य उद्दिष्टे होती.
या कार्यात सहभागी झालेले आणि फाशी गेलेले आणखी एक वीर म्हणजे शिवराम राजगुरू. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत जन्मलेला हा थोर वीर. त्यांचा जन्म १९०८ साली पुणे जिल्ह्यातील खेड येथे एका सामान्य मध्यमवर्गीय हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. ते अगदी लहान वयातच वाराणसीला आले. तिथे त्यांनी संस्कृत शिकून हिंदू धर्मग्रंथांचे वाचन केले. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गनिमी कावा या युद्धतंत्राबद्दल प्रचंड आदर होता. वाराणसीमध्ये त्यांचा क्रांतिकारकांशी संपर्क आला. ते चळवळीत सहभागी झाले आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे सक्रिय सदस्य बनले. राजगुरूंमध्ये निर्भय वृत्ती आणि अदम्य धैर्य होते. त्यांची आराधना आणि भक्तीचा एकमेव विषय म्हणजे मातृभूमी. मातृभूमीच्या मुक्तीसाठी कोणताही त्याग मोठा नाही असे त्यांना वाटत होते. ते चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांचे जवळचे सहकारी होते आणि त्यांचे कार्यक्षेत्र उत्तर प्रदेश व पंजाब होते. त्यात कानपूर, आग्रा आणि लाहोर ही त्यांची मुख्यालये होती. राजगुरू एक निष्णात नेमबाज होते. त्यांनी क्रांतिकारी चळवळीच्या विविध कार्यांत भाग घेतला. हौतात्म्याच्या वेळी राजगुरू अवघे २३ वर्षांचे होते.
फाशीसाठी या वीरांना नेण्यात आले, तेव्हा या तिन्ही वीरांच्या डोळ्यात भिती नव्हती, आपल्या माणसांपासून दुरावले जाण्याचे दु:खही नव्हते. त्यांच्या डोळ्यांत आपल्या मातृभूमीसाठीच्या बलिदानाचा अभिमान होता. त्यांच्या डोळ्यांत होते स्वप्न... आपला देश एक ना एक दिवस नक्कीच स्वतंत्र होईल... आणि त्यांच्या डोळ्यांत होता आत्मविश्वास - आपण देहाकडून देवाकडे जाताना देशासाठी केलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही.. ओठावर एकच ओळ होती - ‘मेरा रंग दे बसंती चोला माये रंग दे...’ भारतमाता की जय! या थोर वीरांना शतश: नमन!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment