सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे दीर्घ काळ वास्तव्य केलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन (चैत्र शुद्ध द्वितीया) नुकताच होऊन गेला. त्या निमित्ताने त्यांचे संक्षिप्त चरित्र...
श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. अनंत कोटी ब्रह्मांडनायक' अशी त्यांची ओळख असून, १८व्या शतकात त्यांनी अक्कलकोटमधील वास्तव्यात अनेकांचा उद्धार केला.
स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल किंवा बालपणाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. असे मानले जाते, की स्वामी कर्दळीवनात हजारो वर्षे तपश्चर्या करत होते. त्यांच्या शरीराभोवती वारूळ तयार झाले होते. एका लाकूडतोड्याने झाड तोडताना वारुळावर कुऱ्हाडीचा घाव घातला आणि स्वामी प्रकट झाले. स्वामींच्या मांडीवर त्या कुऱ्हाडीच्या जखमेची खूण होती, असे सांगितले जाते. प्रकट झाल्यानंतर त्यांनी भारतभर भ्रमण केले. त्यांना चंचलभारती किंवा दिगंबरबुवा या नावांनीही ओळखले जात असे.
स्वामी समर्थ १८५६ साली सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आले. तेथील खंडोबाच्या मंदिरात त्यांनी वास्तव्य केले. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीयेचा होता. पुढील २२ वर्षे त्यांनी याच भूमीत राहून आपल्या लीला दाखवल्या, म्हणून त्यांना अक्कलकोट महाराज असेही संबोधले जाते.
स्वामींनी कधीही कर्मकांडाला महत्त्व दिले नाही, तर शुद्ध भक्ती आणि कर्मावर भर दिला. 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!' हे त्यांचे सर्वांत प्रभावी आणि लाखो भक्तांना धीर देणारे वाक्य आहे. त्यांनी भोंदूगिरीवर कडक प्रहार केला आणि माणसाला स्वावलंबी होण्याचा संदेश दिला. त्यांच्या दरबारात राजा, रंक, हिंदू, मुस्लिम असा कोणताही भेदभाव नसायचा.
स्वामींनी दाखवलेल्या लीला केवळ शक्तिप्रदर्शनासाठी नव्हत्या, तर त्या भक्तांना योग्य मार्गावर आणण्यासाठी होत्या. अक्कलकोटमध्ये एकदा अन्नाची कमतरता भासली असता, स्वामींच्या कृपेने मूठभर अन्नात हजारो लोकांनी भोजन केले. असाध्य रोग झालेल्या अनेक रुग्णांना स्वामींनी केवळ एका दृष्टिक्षेपाने किंवा साध्या उपायांनी बरे केले. दूर अंतरावर असलेल्या भक्तावर संकट आले तरी स्वामींना त्याची जाणीव होत असे आणि ते सूक्ष्म रूपात तिथे पोहोचून मदत करत.
३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र कृष्ण त्रयोदशी) स्वामींनी अक्कलकोट येथे वटवृक्षाखाली आपली अवतारलीला समाप्त केली. ते देहरूपाने नसले, तरी 'मी गेल्याचे मानू नका, मी जिवंतच आहे' या शब्दांत त्यांनी आपल्या अस्तित्वाची भक्तांना ग्वाही दिली आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment