जागतिक रंगभूमी दिन - अमृत महाराष्ट्र

जागतिक रंगभूमी दिन

नाटक या कलेबाबत जनजागृतीसाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या (२७ मार्च) जागतिक रंगभूमी दिनाविषयी...

जागतिक रंगभूमी दिन मुख्य फोटो
मुख्य फोटो

नृत्य, संगीत, चित्रकला अशा ६४ कलांनी मनुष्याचे जीवन संपन्न होत असते. त्यातील एक कला म्हणजे नाट्यकला. तिला नाट्यशास्त्र असेही संबोधले जाते. आपण मराठीतील काही प्रसिद्ध नाटके बघितली असतील. काही कलाकारांची ओळखच मुळात त्या नाटकातील पात्रावरून बनली नाहे. अशा या रंगभूमीवर येऊन आपली कला सादर करणे, लोकांच्या जीवनात थोडा वेळ का होईना - शांतता निर्माण करणे, आपली दु:खे विसरून रंगमंचावरील त्या कलाकृतीत रममाण होण्यास भाग पाडणे, हे खरेच ईश्वरीय कार्यच म्हणायला हवे. अशा या रंगभूमीच्या कलाकारांसाठी आणि या नाटक कलेसाठी समर्पित एखादा दिवस असावा म्हणून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. नाटक या कलेबाबत जनजागृती करण्यासाठी २७ मार्च हा जागतिक रंगभूमी दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो.

अभिनितकला माध्यमातील सर्व सामाजिक घटक आणि देश एकत्र यावेत व त्यांची एखादी संघटना उभारली जावी, असा ठराव दिनांक २७ मार्च १९६१ रोजी थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेद्वारे युनेस्कोमध्ये मांडण्यात आला. थिएटर ऑफ नेशन अर्थात राष्ट्रीय रंगमंच स्थापन करण्यामागील काही महत्त्वाचे मुद्दे या संकल्पनेद्वारे जगासमोर ठेवले गेले. मानवजातीचा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी नाट्यकलेचा नाट्याविष्कार हे सशक्त माध्यम मानले गेले आहे. या माध्यमाचा वापर वैदिक काळापासून ते आजच्या प्रस्थापित रंगभूमीपर्यंत जागतिक पातळीवर विविध अंगांनी झाला आहे. त्यामुळे नाटक हे माध्यम सर्वव्यापी व्हावे, या उद्देशाने थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेची अंमलबजावणी इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट या संस्थेने केली.

नाट्यकलेची सर्वव्यापी सैद्धांतिक व्याख्या, नाटकाचे दृश्यात्मक सामर्थ्य, नाट्यकलेसमोरील आव्हाने, नाट्याभ्यास व संशोधन आणि नाट्यकर्मींची कर्तव्ये या मुद्द्यांवरील विस्तृत चर्चा या संकल्पनेद्वारे मांडण्यात इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट यशस्वी झाली. २७ मार्च १९६१ ते २७ मार्च १९६२ या कालावधीत एकूण ८५ देशांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यामुळे २७ मार्च १९६२पासून युनेस्कोने हाच दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जावा, असा ठराव मंजूर केला. आजपर्यंत थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेशी जगातील ९० देश जोडले गेले आहेत. जागतिक रंगभूमी दिनी एखाद्या मान्यवर नाट्यकर्मीचे नाट्यविषयक तात्त्विक विवेचन प्रसिद्ध केले जाते. १९६२ साली फ्रान्सच्या जीन कॉक्च्यू यांना आपले विचार मांडण्याचा पहिला मान मिळाला. या व्यासपीठावरून पुढे आर्थर मिलर, हेरॉल्ड पिंटर यांच्यासारख्या जगविख्यात नाटककार-रंगकर्मींनी नाटकाविषयीचे आपले चिंतन मांडले. 

शेक्सपिअरने ‘जग ही एक रंगभूमी आहे’ असे म्हटलेले आहे; परंतु रंगभूमीवरून जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेने दिला. नाटकाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला नाट्यसृष्टी आतून व बाहेरून पाहता येते. त्यामुळे नाट्याविष्काराचा प्रत्येक क्षण सजीव असतो व नाटक या प्रक्रियेत तो क्षण नव्याने जन्म घेत असतो, असे यावरील अभ्यासकांचे तात्त्विक चिंतन आहे.

नाट्यशास्त्राच्या अनुषंगाने वाचिक, आंगिक, आहार्य व सात्त्विक असे चार अभिनय प्रकार मांडले गेले आहेत; मात्र मागील २५ वर्षांच्या काळात विकसित झालेल्या मंचीय विचारांमुळे तात्त्विक हा नवा अभिनयप्रकार रुजण्यात थिएटर ऑफ नेशन या चळवळीचे योगदान आहे. जागतिक पातळीवर सैद्धांतिकदृष्ट्या तात्त्विकतेचे विश्लेषण व विवेचनाचे काम नाट्यकर्मींद्वारे सुरू आहे. २७ मार्च १९६२ रोजी जागतिक पातळीवर नाट्यविचारांचा प्रवाह एकत्रितपणे सुरू झाल्यामुळे हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक देशांतील अनेक भागांत या नाट्यकलेच्या विविध छटा सादर केल्या जात्तात. आजच्या या आभासी जगात आपल्याला अशा एखाद्या दमदार कलाविष्काराची नितांत गरज आहे. रंगभूमीवरील तो कलाकार एका अर्थाने आपल्या समाजाचा आरसाच दाखवत असतो. या कलेचा आणि त्यातील सच्च्या कलाकारांचा उत्साह वाढवणे, ही आपणा रसिक प्रेक्षकांची जबाबदारी आहे.

(संदर्भ - मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 27-03-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 100 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 27-03-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 100 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement