१८५७च्या स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पडल्याचा दिवस - अमृत महाराष्ट्र

१८५७च्या स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पडल्याचा दिवस

मंगल पांडे यांनी ब्रिटिशांवर पहिली गोळी चालवली, तो दिवस होता २९ मार्च १८५७.

१८५७च्या स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पडल्याचा दिवस मुख्य फोटो
मुख्य फोटो

मंगल पांडे यांनी ब्रिटिशांच्या विरोधात पहिली गोळी चालवली तो दिवस होता २९ मार्च १८५७. आज इतक्या वर्षांनीही तो संघर्ष आपल्याला लक्षात आहे. गायीची चरबी असलेले काडतूस दाताने चावून काढण्यास मंगल पांडे यांनी नकार दिला. संतापून त्यांनी मेजर ह्युसन आणि लेफ्टनंट बॉघ या ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. १८५७चा स्वातंत्र्यसंग्राम हा या एका घटनेने सुरू झाला. मंगल पांडे यांनी केलेली ही सुरुवात हे या संघर्षाचे निमित्त ठरले. पुढे देशभरात इंग्रजांच्या विरोधात संघर्ष झाले. २९ मार्च हा भारतीय इतिहासातील सर्वांत मोठा दिवस मानला जातो. कारण १८५७ची स्वातंत्र्यासाठीची पहिली चळवळ सुरू झाली ती याच दिवसापासून. १८५७च्या सशस्त्र क्रांतीचे नायक होते मंगल पांडे. मंगल पांडे यांनी आपल्या आक्रमक स्वभावामुळे इतकी दहशत निर्माण केली होती, की ब्रिटिशांनी त्यांना फाशी देण्याचे ठरवले, त्या नियोजित दिवसाच्या दहा दिवस आधीच त्यांना फासावर लटकवले. मंगल पांडे यांना आठ एप्रिल १८५७ रोजी फाशी देण्यात आली. ब्रिटिशांनी कुणालाही याची कुणकुण लागू दिली नव्हती. यातूनच हे दिसून येते, की मंगल पांडेंना ब्रिटिश किती घाबरत होते.

मंगल पांडे यांचा जन्म १९ जुलै १८२७ रोजी फैजाबाद येथील सुरूरपूरमध्ये झाला. १८४९मध्ये वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी मंगल पांडे ईस्ट इंडिया कंपनीच्या ३४व्या बंगाल नेटिव्ह इन्फन्ट्रीमध्ये शिपाई म्हणून भरती झाले. १८५०मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या शिपायांसाठी एनफिल्ड रायफल आणण्यात आल्या. या नव्या रायफलच्या काडतुसांमध्ये गाय आणि डुक्कर यांची चरबी लावलेली असे. काडतूस वापरण्याआधी त्यावरची चरबी तोंडाने काढावी लागे. हिंदू शिपायांना गायीची चरबी असलेली काडतुसे आणि मुस्लिम शिपायांना डुकराची चरबी असलेली काडतुसे दिली जात. हिंदू धर्मात गाय पवित्र आणि मुस्लिम धर्मात डुक्कर निषिद्ध आहे हे इंग्रजांना ठाऊक होते. तरीही हेतुपुरस्सर हे केले जात असे. आपल्याच फौजेत असलेल्या शिपायांच्या धार्मिक भावनांशी इंग्रजांनी हा खेळ केला. मंगल पांडे यांना ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी याचा कडाडून विरोध केला. एवढेच नाही, तर ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले. 

२९ मार्च १८५७ रोजी उठाव करून आणि इंग्रजांवर गोळी चालवून मंगल पांडे यांनी 'काडतूस वापरणार नाही' असे सांगितले. या विरोधानंतर मंगल पांडे यांना ईस्ट इंडिया कंपनीने काढून टाकले. यानंतर मंगल पांडे यांनी त्यांच्यासारखेच इतर शिपाई गोळा केले आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला केला. ‘मारो फिरंगी को’ हा त्यांचा नारा तेव्हा देशभर गाजला होता.

या सगळ्या घटना घडल्यानंतर मंगल पांडे यांना इंग्रजांनी अटक केली. त्यांच्याविरोधात खटला भरला गेला, तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी चालवल्याची बाब मंगल पांडे यांनी मान्य केली. त्यानंतर कोर्टाने त्यांना १८ एप्रिल १८५७ रोजी फाशी द्यावी असा निकाल दिला. इंग्रजांना अशी भीती होती, की जे मंगल पांडे यांनी केले आहे, ते संपूर्ण भारतात पसरले तर आपल्याला देश सोडावा लागेल. त्यामुळे आठ एप्रिललाच मंगल पांडे यांना फाशी देण्यात आले; मात्र इंग्रजांना ज्याची भीती वाटत होती ते प्रत्यक्षात घडले. मंगल पांडे यांच्यामुळे पडलेल्या ठिणगीचा पुढे वणवा झाला. इंग्रजांविरोधात देशभरात संघर्ष झाला. 

भारताचा पहिला स्वातंत्र्यलढा म्हणून या उठावाकडे पाहिलं जातं. फंदफितुरीमुळे आणि इतर अनेक कारणांमुळे हा उठाव मोडून काढण्यात इंग्रजांना यश आले; मात्र ठरवले तर भारतीय लोक काय करू शकतात आणि भारतीय एकत्र आले तर ते आपल्यावर विजय मिळवू शकतात, याची कल्पना यातून इंग्रजांना आली.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 29-03-2026 News publication date | Time: 05:55 AM News publication time | Views: 15 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 29-03-2026 News publication date | Time: 05:55 AM News publication time | Views: 15 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement