थोर कवी वासुदेव गोविंद मायदेव यांचा ३० मार्च हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा अल्प परिचय...
वासुदेव मायदेव हे थोर कवी होते. त्यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील माभळे येथे झाला. त्यांनी काही काळ अनाथ बालिकाश्रमात चिटणीस म्हणून काम केले. पुढे हिंगणे स्त्री-शिक्षण संस्था, नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे सेवासदन व सूतिकासेवा मंदिर या संस्थांमध्ये त्यांनी यथाशक्ती सेवा केली. मराठी भाषेतील जुन्या व नव्या कवींचा योग्य सत्कार व योग्य पुरस्कार होण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मराठी वाङ्मयातील चरित्र, कोश, काव्य या दालनांची सेवा केली. वीर सावरकरांच्या 'माझी जन्मठेप' या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर प्रा. वसंतराव नाईक यांच्याकडून करवून घेताना त्यांनी त्या प्रांतात मदतीचा हात पुरवला.
ईश्वरावर त्यांचा विश्वास होता. त्यांना सगुण उपासना आवडे. त्यांना संत ज्ञानेश्वर हे खरे मार्गदर्शक वाटत. १९६२मध्ये त्यांनी 'वेचलेले क्षण' हे आत्मचरित्र लिहिले. त्यांची भाषा अत्यंत सुबोध, सरळ आणि कौटुंबिक असल्याने त्यांच्या लिहिण्यातील खरेपणा जाणवतो. त्यांनी प्रामुख्याने कविता अधिक लिहिल्या. त्यांच्या 'भावतरंग', 'अभिनयगीत', 'शिशुगीत', 'भावनिर्झर', 'बालविहार', 'सुधा', 'किलबिल', 'भावविहार', 'क्रीडागीत', 'छंदगीत', 'भावपरिमल' या रचना लोकप्रिय झाल्या. त्यांनी 'भा. रा. तांबे कविता भाग १ व २' यांचे संपादन केले. तसेच त्यांनी सावरकर-कविता, सावरकर-काव्य-समालोचन केले. मायदेव हे रविकिरण मंडळातील कवींचे म्हणजे माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींचे समकालीन कवी.
गंभीर विचारवृत्तीच्या, तसेच बालकांसाठीच्या भरपूर कविता मायदेव यांनी लिहिल्या. त्या काळी लहान मुलांमध्ये मायदेव यांच्या बालकविता विशेष आवडीच्या असत. कवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते. मायदेव म्हटले, की कवितांची आवड असणाऱ्या जु्न्या पिढीतील वाचकांना हमखास आठवणार ती त्यांची 'गाई घरा आल्या' ही सुंदर कविता. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या, तरी गाई राखायला गेलेला 'वनमाळी' मात्र काही घरी आलेला नसतो. कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन मायदेव यांनी या कवितेत अतिशय साध्या-सोप्या शब्दांत केले आहे. १९२९ साली त्यांनी ती कविता लिहिली. अशा या श्रेष्ठ कवीचे ३० मार्च १९६९ रोजी निधन झाले.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment