तीन राक्षसांनी एका रात्रीत मंदिर बांधल्याची आख्यायिका
अहिल्यानगर जिल्ह्याच्या नगर तालुक्यातील आगडगाव नावाच्या गावामध्ये एक प्राचीन आणि रहस्यमय असे देवस्थान आहे. अहिल्यानगर शहरापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिराचे ऐतिहासिक,धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे. हे मंदिर मोठ्या दगडांनी बांधलेले असून, त्यावर कोणताही शिलालेख नाही. मंदिराच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांची मुंडकी मूर्तिस्वरूपात लावलेली आहेत. आगडमल, रतडमल आणि देवमल या तीन राक्षसांनी एकाच रात्रीत हे मंदिर बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते. यावरूनच परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव अशा तीन नावांची गावे आहेत.
मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेच्या उभ्या दगडी मूर्ती आहेत. या मूर्ती अत्यंत पुरातन असून, त्यांचे मुखवटे मेणाचे आहेत. सभामंडपातील खांबांवर नागाचे शिल्प कोरलेले आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या खांबाजवळ लिंबाच्या पाल्यावर झोपवल्यास विष उतरते, अशी श्रद्धा आहे. चैत्र महिन्यात येथे भव्य यात्रा भरते. या वेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घालतात. देवाच्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक होते आणि शोभेचे दारूकाम केले जाते.
काळभैरवनाथांचा जन्मसोहळा रात्री बारा वाजता साजरा केला जातो. त्यात भजन, कीर्तन आणि भंडारा होतो. विशेष म्हणजे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री भुतांची यात्रा भरते, अशी आख्यायिका आहे. या दिवशी राक्षस भक्त दर्शनासाठी येतात, असे मानले जाते. १९५०च्या दशकात आणि नंतरही या रात्री काही विचित्र घटना घडल्याचे सांगितले जाते - उदा. दीपमाळेजवळ वीज गेली किंवा भजन करताना पखवाज फुटला, वगैरे.
मंदिराच्या समोर सुशोभित दीपमाळ आहे. तिला चौसष्ट पायऱ्या आहेत. मंदिराजवळ एक कडुनिंबाचे झाड आहे. त्याचा पाला कडू लागत नाही. या झाडाला कल्पवृक्ष असेही संबोधले जाते. मंदिर परिसरात नि:स्पृह बाबांच्या २६ पादुका आहेत. त्यावरून हे मंदिर २६ पिढ्यांपूर्वीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
दर रविवारी आरती झाल्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत आमटी, भाकरी व ठेचा असा महाप्रसाद इथे दिला जातो. एवढ्या कमी वेळेत दोन-तीन हजार भाविक प्रसाद घेतात. वर्षातून एकदा इथे गावातील मुली व जावई यांना आमरस व पाचीपोशाख दिला जातो.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment