सातपुड्याचे रत्न : मेळघाट व्याघ्र प्रकल्प

निसर्गाचा अनमोल खजिना

सातपुड्याचे रत्न : मेळघाट व्याघ्र प्रकल्प मुख्य फोटो
सातपुड्याचे रत्न : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अतिरिक्त फोटो

मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला एक अत्यंत महत्त्वाचा वन्यजीव अभयारण्य परिसर आहे. वन्यजीवप्रेमी, निसर्ग अभ्यासक आणि साहसप्रेमींसाठी मेळघाट म्हणजे निसर्गाचा अनमोल खजिना आहे. भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट टायगरअंतर्गत १९७४ साली स्थापन झालेल्या पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांमध्ये मेळघाटचा समावेश करण्यात आला होता. सुमारे २७६८ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे.

येथील घनदाट जंगले, खोल दऱ्या, उंच डोंगररांगा, नद्या आणि नैसर्गिक अधिवास विविध वन्यजीवांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करतात. मेळघाट अभयारण्य हे वन्यजीव, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे सुरक्षित निवासस्थान मानले जाते. घनदाट जंगलामध्ये पट्टेवाले वाघ, बिबळे, रानगवे, सांबरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, रानडुकरे, रानमांजरे, कोल्हे, तरस, लांडगे आणि ससे यांसारखे अनेक प्राणी आढळतात. तसेच अस्वले, भुईअस्वले, कृष्णमृग आणि उडत्या खारी यांमुळे या जंगलाची जैवविविधता अधिक समृद्ध झाली आहे.

येथील जलाशय आणि जंगल परिसर विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने नेहमीच गजबजलेला असतो. मोर, रानकोंबड्या, करकोचे, बलाक, राखी बगळे, भुरे बगळे आणि विविध प्रकारची बदके येथे सहजपणे पाहायला मिळतात. त्याचबरोबर सर्पगरूड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, बुलबुल, सुतार, पारवे आणि मैना यांसारखे रानपक्षीही मोठ्या प्रमाणात आढळतात.

अभयारण्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचीही मोठी विविधता आहे. घोणस, मण्यार, फुरसे, नाग, अजगर, धामन, हरणटोळ आणि वृक्षसर्प हे विविध साप येथे आढळतात. रंग बदलणारे शॅमेलिऑन सरडे, तसेच इतर अनेक प्रकारचे सरडेही या परिसरात दिसून येतात. नद्यांमध्ये सुमारे २० प्रकारचे मासे आढळतात, तर डोहांमध्ये मगरी आणि घोरपडींचे वास्तव्य असल्याने मेळघाटचे नैसर्गिक वैभव अधिक उठून दिसते. जंगल सफारी, ट्रेकिंग आणि पक्षीनिरीक्षण यांसारख्या उपक्रमांमुळे पर्यटकांना येथे रोमांचक अनुभव मिळतो.

कसे जायचे?

अमरावती ते सेमाडोह : सुमारे १०० किलोमीटर (साधारण २.५ ते ३ तास). 

अमरावती ते धारणी : सुमारे १४५ किलोमीटर (साधारण ३.५ ते ४ तास)

परतवाडा ते चिखलदरा : सुमारे ३० किलोमीटर (साधारण १ तास - घाट रस्ता)

नागपूर ते अमरावती : सुमारे १५५ किलोमीटर (साधारण ३ तास - महामार्ग)

जवळची रेल्वे स्थानके आणि विमानतळ : बडनेरा / अमरावती रेल्वे स्टेशन : सुमारे १०० ते १२० किलोमीटर

नागपूर विमानतळ (निसर्गरम्य मार्गाने) : सुमारे २२० ते २४० किलोमीटर


- केदार गोगरकर - 9112227635


अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत 

Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 27-05-2026 News publication date | Time: 03:32 PM News publication time | Views: 248 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 27-05-2026 News publication date | Time: 03:32 PM News publication time | Views: 248 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement