आर्वीमध्ये महिन्याभराच्या बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता
आर्वी (वर्धा) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या संस्थेतर्फे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची नुकतीच सांगता झाली. महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. हा उपक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने यशस्वीरीत्या राबवण्यात आला.
आठ एप्रिल ते सात मे या कालावधीत पार पडलेल्या या प्रशिक्षणामध्ये महिलांना केक, ब्रेड, बिस्कीट, पिझ्झा, तसेच विविध बेकरी पदार्थ तयार करण्याचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात आल्यामुळे महिलांनी आत्मविश्वासाने प्रत्येक पदार्थ तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले. अनेक महिलांसाठी हे प्रशिक्षण त्यांच्या आयुष्यातील नव्या सुरुवातीचे पाऊल ठरले.
सांगता समारंभाच्या अध्यक्षस्थानी अनंत झाडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक ऋषीकेश खराटे, धीरज राठी, नीलिमा उके आणि प्रशिक्षिका वैशाली क्षीरसागर उपस्थित होत्या. प्रास्ताविकात नीलिमा उके यांनी महिलांच्या प्रगतीसाठी अशा प्रशिक्षणांचे महत्त्व अधोरेखित केले.
जिल्हा व्यवस्थापक ऋषीकेश खराटे यांनी अमृत संस्थेची स्थापना, उद्दिष्टे, लक्ष्यित गट आणि अमृत संस्थेच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची आणि उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना यांसारख्या योजनांची माहिती देऊन, 'नोकरी शोधणाऱ्या नव्हे, तर रोजगार निर्माण करणाऱ्या बना' असा प्रेरणादायी संदेश त्यांनी महिलांना दिला.
उपव्यवस्थापक धीरज राठी यांनी महिलांच्या जिद्दीचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. महिलांनी अतिशय मेहनतीने आणि उत्साहाने प्रशिक्षण पूर्ण केल्याचे सांगून प्रशिक्षिका वैशाली क्षीरसागर यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या वेळी काही लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून हे प्रशिक्षण त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे ठरल्याचे सांगितले. 'आता आम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून आमच्या कुटुंबाला आर्थिक आधार देऊ शकतो,' अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या.
महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज अध्यक्षीय भाषणात अनंत झाडे यांनी व्यक्त केली. महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक कर्ज व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री माईंदे यांनी केले. लाभार्थी प्रज्ञाताई मुधोळकर यांनी उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक व आयोजकांचे आभार मानले. हा उपक्रम म्हणजे अनेक महिलांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारी आणि स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू करणारी प्रेरणादायी सुरुवात ठरली. अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित आणि प्रशिक्षण प्रमुख श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment