नांदेडमध्ये अमृत आणि अष्टदुर्गा सेवा समितीच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराचे धडे
होळी (नांदेड) : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना गृहोद्योगाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी होळी (नांदेड) येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हुमणाबाद येथील अष्टदुर्गा सेवा समितीच्या सौ. स्नेहा कुलकर्णी मुख्य मार्गदर्शक होत्या. त्यांनी महिलांना सांगितले, की 'महिलांनी केवळ गृहिणी न राहता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणे आवश्यक आहे.' घरबसल्या कोणते लघुउद्योग सुरू करता येतात, त्यांचे व्यवस्थापन कसे करावे आणि त्यातून शाश्वत उत्पन्न कसे मिळवावे, याबद्दल सौ. कुलकर्णी यांनी अत्यंत सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली.
या वेळी अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी यांनीदेखील उपस्थित महिलांशी संवाद साधला. त्यांनी 'अमृत' संस्थेच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली आणि या योजनांचा लाभ घेऊन महिला आपली प्रगती कशी साधू शकतात, यावर प्रकाश टाकला. बैठकीचे नेटके नियोजन सौ. सरिता शेश यांनी केले होते. या संपूर्ण उपक्रमात अमृतसखी मनीषा कुनसावळीकर यांनी सक्रिय सहभाग घेऊन महिलांना प्रोत्साहित केले. या बैठकीला होळी परिसरातील महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने अनेक महिलांनी रस दाखवला आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment