सोलापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा एक अविभाज्य भाग
श्री रूपाभवानी मंदिर हा सोलापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे. सोलापूरची रूपाभवानी आणि तुळजापूरची तुळजाभवानी यांच्यात अतूट नाते आहे. 'रूपा' म्हणजे रूप धारण केलेली. तुळजापूरच्या देवीने आपल्या भक्तासाठी येथे प्रत्यक्ष दर्शन दिले, अशी श्रद्धा असल्याने या ठिकाणाला 'प्रति-तुळजापूर' असेही संबोधले जाते. हे मंदिर दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते.
मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते, की येथील सावकार शाह यांच्या शेतात बंडोबा पुजारी हे शेतमजुरीचे काम करत. ते पडीक जमिनीची साफसफाई करून नांगरणी करत असताना नांगराच्या फाळाला लागून पाषाणमूर्ती जमिनीतून वर आली. ती मूर्ती हुबेहूब तुळजाभवानीचे रूप दिसत असल्याने बंडोबा पुजारी यांच्या तोंडून रूपाभवानी अशी हाक बाहेर पडली. त्यामुळे तेथे जमलेल्या लोकांनी देवीला रूपाभवानी नावाने संबोधले. जमलेले लोक देवीला साकडे घालू लागले. त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्याने देवी जागृत असल्याची ख्याती शहरभर पसरली. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली. पुढे सावकार शाह यांनी या ठिकाणी देवीचे मंदिर उभारले. आजही या मंदिरात बंडोबा पुजारी यांचे वंशज देवीची सेवा करतात.
स्थापत्य : मंदिराचे बांधकाम हेमाडपंती शैलीच्या प्रभावाखाली करण्यात आले असून, गाभारा आणि सभामंडप अत्यंत देखणा आहे. मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या जुन्या दगडी भिंती आणि परिसर ऐतिहासिक काळची आठवण करून देतो.
धार्मिक विधी आणि परंपरा
होमहवन : नवरात्रीमध्ये येथे होम विधीला विशेष महत्त्व असते. आश्विन शुद्ध अष्टमीला होणारा होम पाहण्यासाठी सोलापूर शहरातून आणि ग्रामीण भागातून हजारो भाविक येतात.
पालखी सोहळा : दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी निघते. ही पाहणे हा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा असतो.
भवानी पेठ हा व्यापारी परिसर असला, तरी मंदिराच्या आत गेल्यावर शहराचा गोंगाट जाणवत नाही. मंदिराच्या आवारात मोठे वृक्ष आणि मोकळी जागा असल्याने तिथे एक प्रकारची नैसर्गिक शांतता लाभते.
हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून, सोलापूरच्या सामाजिक एकतेचे आणि परंपरेचे प्रतीक आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment