रायगडच्या मातीत उमटलेल्या पाऊलखुणा
रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळच्या चौल (प्राचीन चम्पवती) नगरीचा इतिहास म्हणजे केवळ कथा नाहीत, तर त्या या मातीत उमटलेल्या पाऊलखुणा आहेत. हमामखाना अर्थात शाही स्नानगृह हेही त्यापैकीच एक.
हमामखाना म्हणजे नेमके काय?
हमामखाना हे केवळ आंघोळीचे ठिकाण नव्हते, तर तो त्या काळातील एक सोशल क्लब किंवा विरंगुळ्याचे केंद्र होते. शीतलादेवी मंदिराकडून गोळवा देवीच्या गल्लीकडे जाताना ही वास्तू आजही आपले लक्ष वेधून घेते. साधारण १५व्या ते १६व्या शतकातील अहमदनगरच्या निजामशाही काळात याची निर्मिती झाली. ही वास्तू इंडो-पर्शियन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. मध्य आशियातील गरम पाण्याच्या कारंज्यांची संस्कृती कोकणात उतरवण्याचा हा प्रयत्न होता.
स्थापत्यशास्त्राचा अजब नमुना : हमामखान्याची रचना पाहताना आजही इंजिनीअर्स थक्क होतात. छतावर तीन मोठे घुमट आहेत. त्यावर असलेल्या गोलाकार छिद्रांमुळे नैसर्गिक प्रकाश आत येतो आणि वाफेचे योग्य वायुविजन होते. भिंतींच्या आतून टेराकोटाच्या (मातीच्या) नळ्यांचे जाळे पसरलेले होते. गरम आणि गार पाणी एकाच वेळी खेळवण्याची ही पद्धत आजही विस्मित करते. काळ्या पाषाणाचे चिरे, चुना आणि शिसे यांचा वापर करून हे बांधकाम इतके भक्कम केले आहे, की कोकणच्या पावसाचा आणि खाडीच्या हवेचा यावर फारसा परिणाम झाला नाही.
डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व संशोधकांनी (उदा. डॉ. एम. एस. माटे) या परिसरात केलेल्या उत्खननातून काही महत्त्वपूर्ण बाबी दिसून आल्या. हमामखान्याच्या परिसरात जमिनीखाली सातवाहन कालीन (इ. स. पहिले-दुसरे शतक) मोठ्या विटा सापडल्या आहेत. याचा अर्थ असा, की मध्ययुगीन हमामखाना ज्या जागेवर उभा आहे, ती जागा त्याआधी १२००-१३०० वर्षांपासून मानवी वस्तीसाठी आणि प्रशासनासाठी महत्त्वाची होती. उत्खननात काचेच्या मण्यांच्या भट्ट्या आणि अर्धवट तयार केलेले दागिने सापडले आहेत. यावरून सिद्ध होते, की चौल हे केवळ बंदर नव्हते, तर ते उत्पादनाचे मोठे केंद्र होते.
ऐतिहासिक संदर्भ आणि गॅझेटियर काय सांगतात?
कुलाबा जिल्हा गॅझेटियर (१८८३) : यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, की चौल हे १५ हजारांहून अधिक घरांचे शहर होते. हमामखाना ज्या परिसरात आहे, तो भाग राजवाडा क्षेत्र म्हणून ओळखला जाई.
शिलालेख आणि वीरगळ : चौलमध्ये सापडलेले शिलालेख हे सिद्ध करतात, की हे बंदर रोम, इराण आणि इजिप्तशी थेट जोडलेले होते. येथील रेशमी कापडाला जागतिक बाजारपेठेत सोन्याचे मोल होते.
प्राचीन बंदराचा धक्का आणि आजची स्थिती : हमामखान्यापासून एक-दीड किमी अंतरावर भट्टी नावाचा भाग आहे. तिथे प्राचीन बंदराचे धक्के होते. आज समुद्र मागे सरकला असला, तरी जुन्या रायगड गॅझेटियरमधील माहितीनुसार, मोठी जहाजे थेट चौलच्या वेशीपर्यंत येत असत. तिथून मसाले, कापड आणि नीळ परदेशात पाठवली जाई, तर बदल्यात अरबी घोडे याच भूमीवर उतरवले जात.
आज हा हमामखाना शांत उभा आहे; पण त्याच्या भिंती आजही निजामशाहीचा डामडौल आणि सातवाहनांचे प्राचीनत्व ओरडून सांगत आहेत. आपल्या अलिबागच्या या ऐतिहासिक वारशाची माहिती जगापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे शक्य असेल, तेव्हा चौलच्या वाड्यांमध्ये दडलेला हा इतिहास नक्की अनुभवायला हवा!
संदर्भग्रंथ व स्रोत :
१. कुलाबा जिल्हा गॅझेटियर (१८८३)
२. रायगड जिल्हा गॅझेटियर (सुधारित आवृत्ती)
३. डॉ. एम. एस. माटे यांचे शोधनिबंध (डेक्कन कॉलेज, पुणे)
४. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी (प्राचीन ग्रीक प्रवासवर्णन)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment