जनजागृतीसाठी अमृत मेळावे आयोजित करण्याचा निर्णय
रांजणगाव (पुणे) : रांजणगाव देवस्थानच्या अध्यक्षा सौ. स्वाती दत्तात्रय पाचुंदकर, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तसेच देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार नितीन देव यांना अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या वेळी संस्थेच्या उद्दिष्टांपासून ते विविध योजनांच्या अंमलबजावणीपर्यंत सर्व बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली.
अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. अमृत संस्थेचे पुणे जिल्हा उपव्यवस्थापक कमलाकर कुलकर्णी यांनी या संस्थेच्या कार्यपद्धती, समाजोपयोगी उपक्रम आणि नागरिकांना मिळणारे लाभ याविषयी सविस्तर माहिती देताना, संस्थेच्या माध्यमातून योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली.
या वेळी सौ. स्वाती पाचुंदकर यांनी अमृत संस्थेच्या कार्याविषयी उत्सुकता दाखवली आणि अधिक माहिती जाणून घेतली. तसेच, या योजनांविषयी प्रभावी जनजागृती करण्यासाठी लवकरच मेळावे, मार्गदर्शन शिबिरे आणि जनसंपर्क उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, डॉ. ओमकार देव यांनीही या उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी समाजातील सर्व घटकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवली. या भेटीमुळे अमृत संस्थेच्या कार्याला स्थानिक पातळीवर बळ मिळणार असून, आगामी काळात विविध जनजागृतीपर उपक्रमांमुळे अधिकाधिक नागरिकांना योजनांचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment