शाश्वत विकास विभागप्रमुख कैलास राठोड यांची छत्रपती संभाजीनगर कार्यालयाला भेट
छत्रपती संभाजीनगर : सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या शाश्वत विकास विभागाचे प्रमुख कैलास राठोड यांनी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयाला भेट दिली. या भेटीमध्ये ग्रामीण भागातील युवाशक्तीचा कौशल्य विकास आणि उद्योगाचे विकेंद्रीकरण, तसेच महिला स्वावलंबन, ग्रामीण विकास, शाश्वत शेती, आरोग्य आणि शेतकरी सक्षमीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामीण आरोग्यासाठी काम करत असताना समाजातील अनेक मूलभूत समस्या समोर आल्याने त्यावरही काम करण्याचा निर्णय संस्थेने घेतल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले. हवामानबदल, सामाजिक आणि राजकीय समस्या, तसेच कृषी उत्पादनांसाठी असलेली अस्थिर बाजारपेठ यामुळे शेतकरी आणि कृषीआधारित उपजीविकेसमोर मोठी आव्हाने निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी विस्तार प्रकल्प, बाजारपेठ जोडणी आणि इतर उपक्रमांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
अमृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अमृत स्वायत्त संस्थेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि प्रकल्पांची माहिती श्री. राठोड यांना दिली. तसेच अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रम आणि सेंद्रिय शेतीबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. सर्व योजनांची माहिती समजून घेतल्यानंतर आगामी काळात सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
पत्ता : अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको,
पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment