जॅक्सनवधाची गोष्ट - अमृत महाराष्ट्र

जॅक्सनवधाची गोष्ट

२१ डिसेंबर १९०९ या दिवशी घडलेली रोमांचकारी घटना म्हणजे अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांचा केलेला वध. त्या घटनेविषयी...

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा गोळ्या घालून वध केला. नाशिकचा कलेक्टर ए. एम. टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोसनंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. मिसरूडही न फुटलेल्या असंख्य तरुणांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात सशस्त्र क्रांतीचा मार्ग चोखाळत स्वातंत्र्यवेलीवर आपल्या प्राणांची आहुती दिली. असेच तीन तरुण म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे.
कोकणातील एक युवक माध्यमिक शिक्षणासाठी संभाजीनगरला (पूर्वीचे औरंगाबाद) जातो काय, तेथे क्रांतिकार्यात भाग घेतो काय, त्याच्या हातात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनहून पाठवलेले पिस्तुल पडते काय आणि तो एका कपटी आणि उच्चपदस्थ इंग्रजाचा वध करतो काय, सारेच अतर्क्य आणि अशक्य! पण हे अशक्य कृत्य शक्य करून दाखवणार्‍या युवकाचे नाव होते अनंत लक्ष्मण कान्हेरे. त्यांची शरीरयष्टी काही धिप्पाड नव्हती, तशी किरकोळच होती; पण लहानपणापासूनच मनाने ते अतिशय खंबीर व निश्चयी होते. त्या काळात नाशिक येथे जिल्हा कलेक्टर म्हणून जॅक्सन नावाचा एक अत्यंत क्रूरकर्मा असा इंग्रज अधिकारी होता. त्याने खरे वकील, कीर्तनकार तांबेशास्त्री, बाबाराव सावरकर आदी देशभक्तांना कारावासात धाडले होते. देशभक्तिपर गीतांचे पुस्तक छापले म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भावाला-बाबाराव सावरकरांना-हातापायांत बेड्या ठोकून, नाशिकमधील भर रस्त्यातून चालत कोर्टात नेणारा हा दुष्ट कलेक्टर. नाशिकमधील युवकांनी नुसती वंदे मातरम् एवढी जरी घोषणा दिली, तरी त्यांच्यावर खटले भरणारा क्रूर कलेक्टर.
जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी जॅक्सनला नीट पाहून घेतले. जॅक्सनला मारल्यावर फाशी जावे लागेल, तेव्हा निदान आई-वडिलांकडे आठवणीसाठी आपले एखादे छायाचित्र असावे, म्हणून त्यांनी स्वतःचे एक छायाचित्रही काढून घेतले.
जॅक्सनची मुंबईत वरच्या पदावर बदली करण्यात आली. जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात शारदा नाटकाचा खेळ आयोजित केला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच; पण जॅक्सन इथे येणार म्हणून फक्त नाट्यमंडळी नव्हे, अजूनही तीन व्यक्ती वाट पाहत नाट्यगृहात थांबल्या होत्या. ते तीन तरुण म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे आणि तो दिवस होता; मंगळवार, दिनांक २१ डिसेंबर १९०९. जॅक्सन येताच अनंत कान्हेरे उठला. ताडताड चालत तो सरळ जॅक्सनच्या समोरच जाऊन उभा राहिला. त्याने खिशातून पिस्तूल काढलं. उभे राहून धडाधड चार गोळ्या जॅक्सनच्या छाताडात झाडल्या! रक्तबंबाळ झालेला जॅक्सन खाली कोसळला तो कायमचाच! गोळ्यांचे आवाज ऐकता हा हा कल्लोळ माजला, अन् तितक्यात विनायकराव देशपांडे आणि कर्वे सभागृहातून बाहेर पडले; पण अनंत कान्हेरेने दुसरेही पिस्तुल काढले आणि स्वतःच्या मस्तकी धरले, स्वतःलाही संपवण्याचा त्याचा प्रयत्न मात्र फसला. गोळी चालवण्याआधीच शेजारी उभ्या अधिकाऱ्याने त्याचा हात पकडून त्याला अटकाव केला. पोलिसांनी त्यांना पकडले तेव्हा, माझे कर्तव्य मी केले आहे. मी निसटून जाऊ इच्छित नाही; असे उद्गार त्यांनी काढले. २१ डिसेंबर १९०९ हा दिवस इतिहासात अजरामर झाला. आपल्या कर्तृत्वाने त्या जॅक्सनचा वध करणारा हा केवळ १९ वर्षांचा तरुण अनंत लक्ष्मण कान्हेरे इतिहासात अजरामर झाला.

(संकलित माहिती)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-12-2025 News publication date | Time: 02:21 PM News publication time | Views: 113 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-12-2025 News publication date | Time: 02:21 PM News publication time | Views: 113 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement