चौलचे दत्तमंदिर

रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक चंपावतीनगरमधील टेकडीवरील दत्तस्थान

चौलचे दत्तमंदिर मुख्य फोटो
मुख्य फोटो

रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर चंपावतीनगर म्हणजेच आजचे चेऊल अथवा चौल होय. रेवदंड्यापासून जेमतेम चार-पाच किलोमीटरवर वसलेले शांत, सुंदर चौल. आजूबाजूला भातशेती, कोकणी कौलारू घरे आणि फणसाच्या झाडांची सोबत लाभलेले टुमदार चौल. पावसाळ्यात पाणी घरात येऊ नये म्हणून इथली घरे एका चौथऱ्यावर बांधलेली आढळतात. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, थळ, साखर, अक्षी इत्यादी आठ आगरांच्या मिळून बनलेल्या समूहाला अष्टागर हे नाव पडले आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर हे दत्तस्थान आहे. ही दत्ताची टेकडी या नावाने ओळखली जाते. टेकडीच्या पायथ्याशी भोपाळे तळे या नावाचे एक तळे लागते.

अलिबागपासून १६ किलोमीटरवर, चौल नाक्यापासून दोन किलोमीटरवर डोंगरवजा टेकडीवर अत्यंत नयनरम्य टेकडीवर हे दत्त मंदिर आहे. समृद्ध वनराई उत्तम बांधलेल्या पायऱ्या यामुळे हे स्थान अतिशय प्रेक्षणीयही वाटते. सुमारे ५०० पायऱ्या चढून गेल्यानंतर डाव्याच बाजूला श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. त्यानंतर आणखी ३० पायऱ्या चढून गेल्यावर श्री दत्तमंदिर विश्रांती स्थान आहे. येथेच श्री सद्गुरू बुरांडे महाराजांचे समाधीस्थान आहे. पुढे सुमारे १५० पायऱ्या चढून गेल्यानंतर सत्चित आनंद साधना कुटी आहे. त्यानंतर काही अंतर चालून गेल्यानंतर हरे राम विश्राम धाम व त्यानंतर हरे राम बाबाचे धुनीमंदीर व पुढे औदुंबर मठ आहे. त्यानंतर लगेचच अत्याधुनिक अशा दत्तमंदिराचे बाह्य दर्शनच मोहरून टाकते. येथे सर्वांगसुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती षड्भुज असून पाहताच मन हरवून जाते. प्रदक्षिणेसाठी बाजूने जागा असून मंदिराचा गाभारा थोडा उंचावर आहे. मंदिराच्या दक्षिणेला माई जानकीबाई व हनुमानदास बाबा यांचा मठ आहे.

देवालयाच्या कमानीपासून गाभाऱ्यापर्यंत छोटासा जिना आहे. प्रति वर्षी दत्तजयंतीपासून पाच दिवस येथे मोठा उत्सव होतो. या काळात येथे हजारो लोक येऊन दर्शनाचा लाभ घेतात व सुखी संसारासाठी श्री गुरूंना प्रार्थना करतात. हे मंदिर दत्तात्रेयांचे अत्यंत जागृत स्थान असून अनेक भक्त येथील दर्शनाने मनोकामना पूर्ण झाल्याचे सांगतात. श्री दत्त मंदिरापासून खाली पाहिले असता अत्यंत नयनमनोहर व विहंगम दृश्य दिसते. हे मंदिर शिवरायांच्या काळात बांधल्याचे सांगितले जाते. या अत्युच्च शिखरावरून सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी बांधल्याचे सांगतात त्यावरील लाल कळस असलेले मंदिर स्वामी ब्रह्मेंद्र यांनी बांधल्याचे सांगितले जाते. या मंदिर परिसरात स्वयंभू शिवलिंगही आहे. वर गेल्यावर समोर एक मठ लागतो. तिथे दोन औदुंबर वृक्ष आहेत. त्या वृक्षांखालीच पहिल्यांदा दत्तपादुका होत्या. इथेच वरच्या बाजूला एका मंदिरात दत्तमूर्ती व त्या मूर्तीच्या पुढ्यात मूळ पादुका आहेत. इथे हरेरामबुवा, मुरेडेबुवा, बजरंगदासबुवा, दीपवदासबुवा अशा सत्पुरुषांचे वास्तव्य होते. त्यापैकी मुरेडेबुवांची इथे समाधी आहे. १९६३ साली या स्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आला. इथे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला खूप मोठी यात्रा भरते. ही जत्रा पाच दिवस चालते. हे स्थान मुंबईपासून १०९ किलोमीटर अंतरावर आहे. दत्तभक्तांनी या मंदिरात अवश्य दर्शन घ्यावे.

- सतीश पाटणकर

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 15-05-2026 News publication date | Time: 02:44 PM News publication time | Views: 244 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 15-05-2026 News publication date | Time: 02:44 PM News publication time | Views: 244 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement