तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि उपसभापतींचे मिळणार सहकार्य
पुणे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे पुण्याच्या बारामती तालुक्यात लवकरच विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, ड्रोन प्रशिक्षण उपक्रमासह संस्थेच्या अन्य उपक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येणार आहे. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
बारामतीचे तहसीलदार स्वप्नील अप्पासाहेब रावडे, गटविकास अधिकारी किशोर प्रकाश माने, तसेच उपसभापती शुभांगी सुनील आगवणे यांची भेट घेऊन अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अमृतपेठ, अमृत ड्रोन, अमृत विद्या, अमृत पर्यटन, अमृत मानसमित्र, तसेच व्यवसाय व उद्योग (Bhau/MSSU) योजना, यांसह NIELIT, IGTR, CIPET यांसारख्या नामांकित संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या कौशल्यविकास व रोजगारनिर्मिती योजनांचा लाभ बारामती तालुक्यातील युवक, महिला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन मेळावे व जनजागृतिपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
विशेषतः अमृत ड्रोन मिशनअंतर्गत युवकांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञान, ड्रोन चालवणे, कृषी क्षेत्रातील ड्रोनचा वापर, तसेच रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार असून, ग्रामीण भागातील युवकांसाठी नव्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत. यासोबतच आत्मनिर्भर शेती व सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रमदेखील अमृत संस्थेच्या वतीने विशेष स्वरूपात आयोजित केले जाणार असून, शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेती पद्धतीचे मार्गदर्शन मिळणार आहे.
या उपक्रमांबाबत प्रतिक्रिया देताना उपसभापती शुभांगी सुनील आगवणे यांनी अमृत संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करून 'बारामतीतील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत या योजना पोहोचण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू,' असे सांगितले. गटविकास अधिकारी किशोर प्रकाश माने यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक व नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले. तहसीलदार स्वप्नील आप्पासाहेब रावडे यांनीही अमृत संस्थेच्या रोजगाराभिमुख व कौशल्य विकास उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद देऊन भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अमृत संस्थेच्या सर्वेक्षणाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
राजेंद्र कानडे
छान, कुळकर्णी साहेब अमृतच्या योजनासाठी बारामतीत करीत असलेल्या कार्यास जळगांव जिल्हा अमृत टीम कडून हार्दिक शुभेच्छा.
Write a Comment