अमृत संस्थेचा उपक्रम
परतवाडा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवक-युवतींना स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करून सक्षम व्यावसायिक तयार करणे हा आहे.
प्रशिक्षक तुषार लोटांगणे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय उभारणी, उद्योजकतेचे महत्त्व, बाजारपेठेतील संधी तसेच आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक कौशल्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. व्यवसाय सुरू करताना आवश्यक असलेले नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, ग्राहकसेवा, सातत्य आणि कौशल्यविकास यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर अमृत माहिती केंद्राचे रोहित पांडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, स्वयंरोजगाराच्या संधी, तसेच शासनाच्या साह्यकारी उपक्रमांविषयी माहिती दिली. युवकांनी रोजगार शोधण्याऐवजी रोजगारनिर्मितीकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर, उपव्यवस्थापक ऋषिकेश कथलकर उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच अशा प्रशिक्षण उपक्रमांमुळे युवकांमध्ये कौशल्यविकास, आत्मविश्वास आणि उद्योजकतेची वृत्ती विकसित होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रशिक्षण बॅचमध्ये एकूण १५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून, उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रशिक्षणाला औपचारिक सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना सैद्धांतिक व प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय नियोजन, उद्योग व्यवस्थापन, ऑनलाइन व ऑफलाइन व्यवसाय संकल्पना, डिजिटल व्यवहार, बाजारपेठ विश्लेषण, ग्राहक व्यवस्थापन, व्यवसाय नोंदणी प्रक्रिया, तसेच आर्थिक साह्याच्या योजनांविषयी माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अमृतपेठ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, अमृतपेठ ऑफलाइन, वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, ड्रोन मिशन, कौशल्यविकास योजना, तसेच स्वयंरोजगाराशी संबंधित विविध शासकीय उपक्रमांची सखोल माहिती प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे स्थानिक युवकांमध्ये उद्योजकतेबाबत जागरूकता निर्माण होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment