६५ विद्यार्थ्यांचा सहभाग
सिल्लोड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील मौजे केरळा येथे अमृत मेळावा कार्यशाळेचा उत्साहात प्रारंभ झाला. श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था तथा अनाथालय येथे ही दोन दिवसांची कार्यशाळा सुरू झाली असून, अमृत संस्थेच्या अमृतवर्ग या किशोरवयीनांसाठीच्या उपक्रमांतर्गत ती आयोजित करण्यात आली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेले सुमारे ६५ विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.
कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा व्यवस्थाप्रमुख संदीप झालाणी व पर्यावरण गतिविधी प्रमुख डॉ. संतोष पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शांतीपाठाने झाली. या वेळी डॉ. संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले. वृक्ष, पक्षी, फुलपाखरे, मधमाश्या यांचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट करून प्लास्टिक प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणामही त्यांनी सांगितले. गावांची नावे अनेकदा झाडांवरून पडल्याची उदाहरणे देऊन त्यांनी वृक्ष आणि संस्कृतीचे नाते अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी येत्या पावसाळ्यात किमान पाच झाडे लावण्याचा संकल्प केला.
अमृतवर्ग या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले जात आहेत. प्रार्थना, प्राणायाम, सूर्यनमस्कार, देशभक्तिपर गीते, प्रेरणादायी गोष्टी आणि विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार रुजवले जात आहेत. ही कार्यशाळा अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रमुख ह. भ. प. देविदासमहाराज मिसाळ यांचे विशेष सहकार्य लाभले. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांच्यासह श्याम जोशी, राहुल पांढरे आदी मान्यवर, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment