अमृत संस्थेचा निःशुल्क बेकरी प्रशिक्षण वर्ग कोल्हापुरात सुरू - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेचा निःशुल्क बेकरी प्रशिक्षण वर्ग कोल्हापुरात सुरू

महिनाभर चालणार असलेल्या वर्गाला महिलांचा चांगला प्रतिसाद

अमृत संस्थेचा निःशुल्क बेकरी प्रशिक्षण वर्ग कोल्हापुरात सुरू मुख्य फोटो
अमृत संस्थेचा निःशुल्क बेकरी प्रशिक्षण वर्ग कोल्हापुरात सुरू अतिरिक्त फोटो

कोल्हापूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात आयोजित केलेला बेकरी प्रशिक्षण वर्ग सुरू झाला आहे. या महिन्याभराच्या निःशुल्क प्रशिक्षण वर्गात बेकरी व्यवसायातील नामांकित संस्थेकडून प्रशिक्षण दिले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांना, तसेच महिलांना उद्योगविश्वात पाऊल टाकून प्रगती करण्याच्या दृष्टीने ही सुवर्णसंधी आहे असल्याचे प्रतिपादन अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी केले. १८ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झालेल्या या बॅचची सांगता १७ जानेवारी २०२६ या दिवशी होणार आहे.

'महिलांनी अन्नप्रक्रिया उद्योगक्षेत्रामध्ये यशस्वी उद्योजक होण्याच्या दृष्टीने बेकरी प्रशिक्षण हे पहिले पाऊल म्हणावे लागेल. बॅचमधील महिला खूप उत्साही आहेत. उद्योग करण्याच्या दृष्टीने इच्छुक असलेल्या महिलांचीच निवड यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे इथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लवकरच त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहेत. तसेच, आपल्या अमृतपेठ उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसायाला नवी दिशा देणार आहे,' असे जोशी म्हणाले.

'एमसीईडीच्या माध्यमातून निवडलेले ट्रेनर आणि प्रशिक्षण देणारी इन्स्टिट्यूट दर्जेदार असल्यामुळे प्रशिक्षणार्थींना दर्जेदार प्रशिक्षण मिळत आहे. प्रशिक्षणार्थींनीही हा अनुभव सांगितला आहे. सध्या असलेल्या लोकांच्या मागणीनुसार आणि गरजेनुसार नवनवीन पदार्थ शिकण्यासाठी सुचवले जात आहेत आणि त्याचे प्रशिक्षणही देण्याची ग्वाही इन्स्टिट्यूटने त्यांना दिली आहे. त्यामुळे या बॅचमध्ये उत्साह व चैतन्याचे वातावरण आहे. ज्या कोणाला बेकरी प्रशिक्षण घ्यायचे आहे किंवा या क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्याचे नियोजन आहे, अशा इच्छुकांनी एकदा प्रशिक्षणार्थींच्या या बॅचला नक्की भेट द्यावी,' असे आवाहनही जोशी यांनी केले. नवउद्योजक घडवण्याच्या दृष्टीने कोल्हापूरकरांनी अमृत ही संस्था करत असलेल्या प्रयत्नांना खूप चांगला प्रतिसाद दिला असल्याचे या बॅचच्या प्रतिसादावरून म्हणता येईल, असे जोशी यांनी नमूद केले.

प्रशिक्षणार्थींना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊ आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून घडण्यासाठी लागणारी सर्व मदत करू, असे आश्वासन एमसीईडीच्या प्रकल्प अधिकारी वनिता पाटील दिले. प्रशिक्षणानंतरही आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षकांनी त्यांना दिला. कॉन्टिनेन्टल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेत हे प्रशिक्षण दिले जात आहे.

प्रशिक्षणात नेमके काय काय आहे?

तांत्रिक प्रशिक्षण : २४ दिवस
- बेकरी उत्पादनांची व्याप्ती आणि महत्त्व
- बेकरीमध्ये विविध व्यवसाय संधी
- बेकरी उत्पादनांच्या उत्पादनासाठी विविध तंत्रे
- विविध बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी विशेष उपकरणे आणि साधने यांबाबत माहिती
- केकचे प्रकार, टी-टाइम केकचे प्रकार, कुकीजचे प्रकार, पफ पेस्ट्रीजचे प्रकार,
- ब्रेड, टोस्ट, पाव, पिझ्झा आणि बर्गर-बन, चॉकलेटचे प्रकार तयार करणे – थिअरी व प्रात्यक्षिक प्रशिक्षण
- तयार मालाच्या गुणवत्तेचे मापदंड
- अन्नसुरक्षा आणि वैयक्तिक स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षा पद्धती
- FSSAI परवाना आणि उद्यम नोंदणीसाठी अर्ज कसा करावा?

उद्योजकता विकास प्रशिक्षण : ६ दिवस
- उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास
- यशस्वी उद्योजकाशी संवाद
- सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट
- बाजारपेठ पाहणी आणि तंत्रे
- उद्योगाची उभारणी
- उद्योगाचे व्यवस्थापन
- शासकीय कर्ज आणि अनुदान योजना
बँकेची भूमिका आणि योजना
अभिप्रेरणा प्रशिक्षण (AMT)
PPR आणि DPR तयार करणे (डीटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट)
उद्योगांना भेटी

अमृत संस्थेच्या या आणि अन्य वेगवेगळ्या योजनांच्या अधिक माहितीसाठी संपर्क :

प्रशांत जोशी
जिल्हा व्यवस्थापक, अमृत, कोल्हापूर
9112228764

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 23-12-2025 News publication date | Time: 11:56 PM News publication time | Views: 229 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 23-12-2025 News publication date | Time: 11:56 PM News publication time | Views: 229 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement