भारतातील वैशिष्ट्यपूर्ण गुरू-शिष्य परंपरा - अमृत महाराष्ट्र

भारतातील वैशिष्ट्यपूर्ण गुरू-शिष्य परंपरा

एक जानेवारीच्या कल्पतरू दिनानिमित्त महान परंपरेचा आढावा

भारतातील वैशिष्ट्यपूर्ण गुरू-शिष्य परंपरा मुख्य फोटो
मुख्य फोटो

एक जानेवारी हा दिवस आंग्ल वर्षाचा पहिला दिवस असला, तरी तो आणखी एका कारणाने प्रसिद्ध आहे. हा दिवस कल्पतरू दिन अर्थात कल्पतरू दिवस किंवा कल्पतरू उत्सव म्हणून ओळखला जातो. कारण श्री रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या शिष्यांना एक जानेवारी १८८६ या दिवशी खास आध्यात्मिक अनुभूती दिली होती. त्या दिवसाच्या निमित्ताने भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गुरू-शिष्य परंपरेचा थोडक्यात आढावा.

कल्पतरू दिवस का साजरा करतात, त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय, हे आपण आधीच्या लेखातून जाणून घेतले. भारतीय ज्ञानपरंपरेत गुरुस्थानी असलेल्या व्यक्ती ज्ञानी आणि परिपूर्ण होत्या. रामकृष्ण परमहंस हे या महान गुरुपरंपरेतील एक अग्रणी नाव होते. आपल्या भारतीय संस्कृतीचा मागोवा घेतला तर अशा गुरू-शिष्य परंपरेतील अनेक उदाहरणे सापडतील.

एकदा एका विदेशी व्यक्तीने स्वामी विवेकानंद यांना प्रश्‍न विचारला, ‘‘भारताचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास कसे कराल ?’’ तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी सांगितले, ‘‘गुरू-शिष्य परंपरा !’’ गुरू-शिष्य अशा सुरेख संगमातून या महान राष्ट्राच्या निर्मितीला हातभार लागल्याची अनेक उदाहरणे पुराणकाळापासून इतिहासापर्यंत पहायला मिळतात. उदा. श्रीराम आणि वसिष्ठ, पांडव आणि श्रीकृष्ण इत्यादी. यांच्या जोडीला चंद्रगुप्त मौर्य-आर्य चाणक्य यांचे उदाहरणही आहे. चंद्रगुप्ताला आर्य चाणक्यांनी गुरू म्हणून मार्गदर्शन केले आणि एका बलशाली राष्ट्राची उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी मार्गदर्शन केले अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच बादशाह्यांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपल्यासमोरील आदर्श आहेत.

गुरू-शिष्य परंपरा ही शिक्षणाची एक प्राचीन व अत्यंत गौरवशाली पद्धत आहे. तिची मुळे वैदिक काळात असून, या परंपरेत गुरू शिष्याला तोंडी स्वरूपात ज्ञान प्रदान करतात. त्याला ‘गुरुमुख’ असे म्हणतात. या पद्धतीत शिष्य गुरुकुलात वास्तव्यास राहतो, गुरूंची सेवा करतो, कठोर शिस्त पाळतो आणि दिलेले शिक्षण आत्मसात करण्यासाठी सातत्याने सराव व पाठांतर करतो. या शिक्षणात केवळ धर्मज्ञान, शासन कसे करायचे, याचे प्रशिक्षण किंवा विविध अस्त्र-शस्त्रे चालवण्याचे तंत्र एवढेच शिकवले जायचे का? तर नाही. या गुरुकुलात अगदी राजाच्या मुलापासून ते सामान्य मुलांपर्यंत अनेक जातीची, वर्णाची मुले वास्तव्यास होती. त्यामुळे साहजिकच समरसता, कर्तव्यभान, नेतृत्वकौशल्य, जे आजच्या काळात अतिशय महत्त्वाचे आहे - समन्वय साधणे, संयम आणि महत्त्वाचे म्हणजे संस्कार अशा अनेक कौशल्यांचे शिक्षण आपोआपच मुलांना मिळत होते. पारंपरिक पद्धतीने होणारे पाठांतर, श्रवण, निरीक्षण, अनुकरण या सगळ्याची रोजच उजळणी होत होती. विशेष म्हणजे हे सगळे एका छताखाली, विनासायास आणि पिढ्यान् पिढ्या घडत होते.

गुरू-शिष्य परंपरा भारतात सुमारे २५०० वर्षांहून अधिक काळ फुलत आली आहे. संगीत, नृत्य किंवा चित्रकला यांसारख्या कलांमध्ये पारंगत असलेली व्यक्ती शिक्षक होऊ शकते; मात्र गुरू हा केवळ विषयज्ञान देणारा नसून, तो आपल्या शिष्याचा मार्गदर्शक, प्रेरणादायी आदर्श आणि आध्यात्मिक गुरू असतो. तो आपल्या शिष्याला केवळ विद्या नव्हे, तर जीवनदृष्टी देतो. या परंपरेत गुरू आणि शिष्य दोघांमध्येही प्रामाणिकपणा, निष्ठा व अखंड समर्पण असणे अत्यावश्यक आहे. मार्गदर्शन आणि विकास यामध्ये सुसंवाद व समतोल राखण्यासाठी हे गुण महत्त्वाचे ठरतात. परस्पर सन्मान, विश्वास आणि वैयक्तिक, तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठीची सामायिक बांधिलकी यांवर आधारित हे नाते अत्यंत दृढ व वैशिष्ट्यपूर्ण असते. हे असेच नाते आपण कित्येक कथांमधून, उदाहरणांमधून वाचले असेलच.

आजच्या काळात या परंपरेची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. कारण आपण आपल्या मुलांना जे शिक्षण देतो त्यातून केवळ परीक्षार्थी न घडता एक संस्कारी, देशाभिमानी आणि मुख्य म्हणजे संवेदनशील पिढी घडणे आवश्यक आहे. त्यातूनच उत्तम समाजनिर्मिती आणि पुढे जाऊन भक्कम पाया असलेल्या राष्ट्राची निर्मिती होईल, यात शंका नाही.

(संकलित)

(कल्पतरू दिनाविषयी माहिती देणारा लेख वाचा पुढील लिंकवर... https://amrutmaharashtra.org/news.php?id=326)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 31-12-2025 News publication date | Time: 01:06 PM News publication time | Views: 105 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 31-12-2025 News publication date | Time: 01:06 PM News publication time | Views: 105 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement