चांगल्या सवयी कशा लावायच्या आणि टिकवायच्या याचं मार्गदर्शन करणारं पुस्तक
अॅटॉमिक हॅबिट्स (Atomic Habits) हे एक स्व-मदत अर्थात सेल्फ हेल्प प्रकारचं पुस्तक आहे. आपलं वागणं, अपल्या सवयी यातून आपलं व्यक्तिमत्त्व जगासमोर येत असतं. आपला मूळ स्वभाव (पिंड), आपल्यावर झालेले संस्कार, त्यातून जडलेल्या सवयी आपल्या आयुष्याला आकार देत असतात. आपण म्हणतो 'माणूस सवयीचा गुलाम आहे;' पण सगळ्याच सवयी काही जन्मजात नसतात. आपण जसजसे वयाच्या विविध टप्प्यांतून जात असतो, तशा आपल्याला काही नवीन सवयी लागत राहतात. जुन्या सवयी सुटतात. म्हणजे आपण सवयींचे गुलाम आहोत असं म्हटलं तरी स्वतःला सवय लावून घेणारेही आपणच असतो; मात्र चुकीच्या सवयी लवकर लागतात आणि चांगल्या सवयी लावायला वेळ आणि चिकाटी लागते. या बाबतीत लेखक जेम्स क्लिअर आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून नवीन गोष्टी समजावतो. या पुस्तकाचा मराठी अनुवादही उपलब्ध आहे.
आपण एखादी चांगली सवय अंगीकारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खूप मोठं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवतो. आता या नवीन सवयींचं आपण जन्मभर पालन करू, अशी शपथच घेतो म्हणा ना! पण या 'आयुष्यभरा'चं आयुष्य असतं काही दिवस, फार फार तर काही आठवडे. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. हे टाळायचं असेल तर लेखकाने पुस्तकात काही छान क्लृप्त्या दिल्या आहेत. जसं की, मोठ्या गोष्टीच्या अगदी छोट्या भागाने सुरुवात करा, जी पटकन होईल. म्हणजे रोज व्यायाम करीन असं म्हणायच्या ऐवजी आधी व्यायामाच्या वेळी फक्त व्यायामासाठी तयार राहीन इतकंच. त्याची सवय झाली, की आता त्या वेळी बूट घालून खाली जाऊन येईन इतकंच. मग पुढे एक राउंड मारीन...बास. असं करत करत स्वतःत हळूहळू बदल केला पाहिजे. हे बदल होताना स्वतःच स्वतःला प्रोत्साहित करण्यासाठी काहीतरी बक्षीससुद्धा दिलं पाहिजे.
हे असं का करायचं, यामागे मनोवैज्ञानिक आणि जीवशास्त्रीय कारणं आहेत, हेही लेखकाने छान समजावून सांगितलं आहे. उदा. आपल्याला वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे हे तर आपण आधी ठरवतो; पण गोड पदार्थ किंवा कोणताही चमचमीत पदार्थ दिसला की आपला ताबा सुटतो. संकल्प मोडतो. आपण तो पदार्थ खातो. याचं कारण आपला मेंदू! सुरुवातीच्या म्हणजे आदिमानवाच्या काळात माणूससुद्धा इतर प्राण्यांसारखा अन्नाच्या शोधात फिरणारा प्राणी होता. जिवंत राहायचं तर भरपूर अन्न मिळालं पाहिजे. म्हणून जेव्हा अन्न मिळेल तेव्हा खाऊन घ्या. जास्त उष्मांक (कॅलरी) असणारा अन्नपदार्थ दिसला की खाऊन घ्यायचा. न जाणो पुन्हा अन्न कधी मिळेल. वादळ, पाऊस, दुष्काळ आला तर? शिकारीच्या भीतीमुळे बाहेर पडताच आलं नाही तर ? म्हणून 'घ्या खाऊन.' उत्क्रांतीच्या टप्प्यात माणसाचा मेंदू विकसित झाला खरा; पण अजूनही अशा काही जुन्या धारणा मेंदूत 'फिट' आहेत! म्हणून गोडधोड दिसलं की मेंदू म्हणतो 'घ्या खाऊन.' म्हणूनच लेखकाचं म्हणणं आहे फक्त आत्मसंयम ही बाब सवयी टिकण्यासाठी उपयुक्त नाही, तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचीही त्याला साथ मिळाली पाहिजे.
मग त्यासाठी आपण काय करू शकतो? प्रलोभनं कमी दिसतील अशा पद्धतीने आपल्या घरातल्या किंवा ऑफिसच्या वस्तूंची रचना करता येईल का? चुकीची गोष्ट करणं स्वतःसाठीच कठीण करून ठेवता येईल का? उदा. मोबाइलचं व्यसन सोडायचं असेल तर मोबाइल स्वतःपासून लांब ठेवणं, पासवर्ड बदलून टाकणं इत्यादी केलं तरी प्रत्येक वेळी उठून मोबाइल बघायला जाणं कमी होईल. अशा पद्धतीने चांगल्या कृती स्वतःसाठी सोप्या करायच्या, म्हणजे वाईट सवयी स्वतःसाठीच कठीण करायच्या.
सवयी टिकवण्यासासाठी अजून एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे आपल्या वागण्याची नोंद ठेवायची, जेणेकरून किती वेळा आणि किती कालावधी आपण सवय पाळली, किती वेळा मोडली हे स्वतःलाच समजेल. आपण आता सवय पाळू लागलो आहोत, हे बघून आपलाच हुरूप वाढेल आणि सवय टिकायची शक्यता वाढेल. अशा कितीतरी कल्पना, सल्ले, टिप्स पुस्तकात दिल्या आहेत. सवय लागण्याचे फायदे आहेत, तसे काही धोकेसुद्धा आहेत. म्हणजे असं, की एखाद्या गोष्टीची सवय लागली की आपण त्याच पद्धतीने वागत राहू. काळानुरूप काही बदल करायला हवा, सुधारणा करायला हवी, याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. किंवा त्या कृतीचा पुढचा टप्पा – नैपुण्य – गाठण्याऐवजी आता हे असं जमतंय तसंच चालू राहू दे, असं वाटू शकतं. हे टाळता आलं पाहिजे याबद्दलही लेखकाने मार्गदर्शन केलं आहे. आपला पिंड, आपली गुणसूत्रे आणि सवयी यांचा परस्परसंबंध आहे. केवळ जन्मजात हुशारी किंवा कौशल्य आहे म्हणून कोणी यशस्वी ठरत नाही. तसंच केवळ मेहनत करून अगदी योग्य दिनचर्या, सराव करूनही अपेक्षित यश मिळणार नाही. त्यासाठी उपजत गुणही आवश्यक आहेत. या दोन्हींचा विचार करून आपलं ध्येय ठरवलं तर यश मिळण्याच्या शक्यता कशा वाढतील, हे लेखकाने स्पष्ट केलं आहे. आवर्जून पुन्हा पुन्हा वाचावं असं हे पुस्तक आहे.
पुस्तकाचं नाव - अॅटॉमिक हॅबिट्स
लेखक - जेम्स क्लिअर
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment