अमृत दुर्गोत्सवाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र दिमाखात झळकतेय भिंतीवर
नागपूर : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे दिवाळीच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या अमृत दुर्गोत्सव या अभिनव उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. 'मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वांत मोठा डिजिटल फोटो अल्बम' या श्रेणीत हा विश्वविक्रम नोंदवला गेला. त्याचे अधिकृत प्रमाणपत्र नोव्हेंबर महिन्यात संस्थेला प्राप्त झाले. ते प्रमाणपत्र अमृत संस्थेच्या प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालयात आता फ्रेम करून लावले जाणार आहे. नागपूर कार्यालयात या प्रमाणपत्राची फ्रेम अमृत संस्थेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित यांच्या हस्ते नुकतीच लावण्यात आली.
या वेळी बोलताना देवदत्त पंडित यांनी अमृत संस्थेच्या टीमचे मनापासून अभिनंदन व कौतुक केले. अमृत दुर्गोत्सव उपक्रमासाठी सर्वांनी केलेली मेहनत, समर्पण आणि संघभावनेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यातही अशाच जोमाने व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करत राहण्याचे आवाहन केले. हे प्रमाणपत्र समोर दिसत राहिल्यामुळे पुढील उपक्रम अधिक प्रभावीपणे व अधिक उत्साहात राबविण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळत राहील, अशी प्रातिनिधिक भावना या वेळी व्यक्त झाली. या वेळी विभागीय उपव्यवस्थापक ओंकार गांधी, नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, जिल्हा उपव्यवस्थापक सौ. वृषाली सवनकर, जिल्हा उपव्यवस्थापक प्रतीक आकरे, अमृतमित्र निखिल देशपांडे, अमृतसखी दर्शना जाब्रस, अमृतसखी सौ. नीतू वडसकर, आयटी विभागाचे अमेय बरबडीकर आदी उपस्थित होते.
‘अमृत दुर्गोत्सव’ हा महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ या स्वायत्त संस्थेचा एक महत्त्वाकांक्षी व नावीन्यपूर्ण उपक्रम असून, यामध्ये नागरिकांनी छत्रपती शिवरायांच्या गड–दुर्गांच्या प्रतिकृती तयार करून त्यांचे सेल्फी अपलोड केले होते. या उपक्रमात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला. या व्यापक जनसहभागामुळेच या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून, सहभागी नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदनपत्रही प्रदान करण्यात आले आहे.
‘अमृत’ ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, ती इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत आहे. या ऐतिहासिक उपक्रमाची संकल्पना अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांची होती.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment