न खाई भोगी तो सदा रोगी! - अमृत महाराष्ट्र

न खाई भोगी तो सदा रोगी!

लक्षात घेऊ या वैज्ञानिक दृष्टिकोन

न खाई भोगी तो सदा रोगी! मुख्य फोटो
मुख्य फोटो

भारत देश हा सणांचा देश आहे. आपला प्रत्येक सण, उत्सव आणि सर्व परंपरा निसर्गाशी आणि विज्ञानाशी संबंधित आहेत. आपण निसर्गाचा एक भाग आहोत. त्यामुळे जेव्हा ऋतू बदलतात, तेव्हा वातावरणात होणाऱ्या बदलानुसार आपल्या आहारात, जीवनशैलीत बदल व्हावा, या दृष्टीने पहिला दिवस म्हणून सणाचा किंवा उत्सवाचा दिवस नेमून दिलेला आहे. सण, उत्सवांकडे केवळ एक परंपरा म्हणून न बघता त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेतला पाहिजे. 

त्यापैकीच एक म्हणजे मकरसंक्रांत. दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू झाले आहे. या वेळी सूर्याची किरणे उत्तर गोलार्धात थेट पडायला लागतात. दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्र छोटी होऊ लागते. या पर्यावरणीय बदलासाठी आपले शरीर तयार असावे, या काळात लागणारी ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण होण्याकरिता तीळ, गूळ यांचा वापर जास्त व्हावा, म्हणून संक्रांतीचा तीळगूळ आणि आदल्या दिवशी भोगीची भाजी ही तरतूद आहे. 

मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा दिवस म्हणजे भोगी. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण आपल्या आजीकडून ऐकले असेल; मात्र, या भोगी शब्दाचा शब्दश: अर्थ काय हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. भोगी हा इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला हिंदू सण असून, हा सण मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो. भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा. या सणाच्या दिवशी घर, तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून अंगणात रांगोळी काढण्यात येते. तसेच घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याचीदेखील पद्धत आहे. असे केल्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही. त्याचप्रमाणे या दिवशी मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात. 

या काळात हिवाळा असतो. विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. तसेच शेताला नवीन बहर आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यालाही थोड्या पौष्टिक आणि उर्जा देणाऱ्या भाज्यांची गरज भासते. या भोगी सणानिमित्त भोगीची भाजी आणि त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी अतिशय चवदार लागते आणि ती भोगी सर्वत्र केली जाते; मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडाबहुत फरक असतो. यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगी, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात. 

बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. भोगीच्या भाजीतही तिळाचे कूट घातले जाते. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. फक्त या सणाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. तामिळनाडूत हा सण ‘पोंगल’ म्हणून, तर आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात. पंजाबमध्ये ‘लोहिरी’, राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. 

यावरून एक लक्षात येईल, की हा उत्सव वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो; पण या सगळ्यामागे एकच संकल्पना आहे ती म्हणजे निसर्गाचा आणि आपल्या अवतीभवती असलेल्या सजीवांचा सन्मान ठेवून त्यांच्याशी एकरूप होऊन आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊन हे सण, उत्सव साजरे केले जातात. 

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 10:26 AM News publication time | Views: 296 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 10:26 AM News publication time | Views: 296 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement