चिं. वि. जोशी - अमृत महाराष्ट्र

चिं. वि. जोशी

दर्जेदार विनोदी लेखन करणारे थोर साहित्यिक चिं. वि. जोशी यांची १९ जानेवारी ही जयंती...

चिं. वि. जोशी मुख्य फोटो
मुख्य फोटो

सर्व लेखनप्रकारांमध्ये अवघड असा कोणता लेखनप्रकार असेल, तर तो विनोदी लेखनाचा. कारण माणसाला रडवणे सोपे असते, परंतु हसवणे मात्र खूप अवघड असते. मराठी भाषा आणि त्यातील साहित्यनिर्मिती इतकी विविधांगी आहे, की त्यात असे विनोदी लेखन करणारे अनेक साहित्यिक दिसतील. अर्थात दर्जेदार विनोद हीसुद्धा एक कला आहे आणि ती प्रत्येक लेखकाला साध्य होतेच असे नाही. मराठी विश्वात असे दर्जेदार विनोदी लेखक अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आहेत. त्यातील एक लेखक म्हणजे चिंतामण विनायक जोशी अर्थात चिं. वि. जोशी. १९ जानेवारी या त्यांच्या जन्मदिनी जाणून घेऊ या त्यांच्या लेखनप्रवासाविषयी.

चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नूतन मराठी विद्यालयात झाले. फर्ग्युसन कॉलेजातून ते बीए (१९१३) आणि एमए (१९१६) झाले. त्यांचा पाली भाषेचा विशेष व्यासंग होता. त्यांनी आरंभी चार वर्षे सरकारी शिक्षण खात्यात माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले. पुढे १९२०पासून बडोदा कॉलेजात पाली, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. 'अ मॅन्युअल ऑफ पाली सद्धम्मप्पकासिनी' (संपादक), 'पाली कंकॉर्डन्स' (कोश), 'जातकांतील निवडक गोष्टी' (१९३०), 'शाक्यमुनी गौतम' (१९३५), 'बुद्धसंप्रदाय व शिकवण' (१९६३) ही त्यांची ग्रंथनिर्मिती त्यांच्या पालीच्या व्यासंगाची द्योतक आहे; पण याहीपेक्षा चाळीसहून अधिक पुस्तके लिहून त्यांनी मराठी विनोदाच्या क्षेत्रात जी कामगिरी बजावली ती विशेष महत्त्वाची आहे. विनोदी लेखनाची प्रेरणा त्यांना कोल्हटकर-गडकर्‍यांच्या कोटित्वयुक्त लेखनातून मिळाली व त्याचा ठसा आपल्याला त्यांच्या प्रारंभीच्या 'एरंडाचे गुर्‍हाळ'मधील (१९३२) लेखन व 'चिमणरावांचे चर्‍हाट'मधील (१९३३) विवाहविषयक लेख यांवर स्पष्ट दिसतो.

त्यांच्या कथांवर आधारित 'सरकारी पाहुणे', 'लग्न पाहावं करून'सारखे सिनेमे आणि मुंबई दूरदर्शनवरची मालिका यांनी मराठी माणसांच्या मनात घरं केलं. चिमणराव, गुंड्याभाऊ, काऊ, मोरू, मैना, राघू असे सर्वच कुटुंबीय जणू दर्शकांच्या घरचेच होऊन गेले होते. त्यांच्या चित्रणात अतिशयोक्तीपेक्षा स्वभावोक्तीवर आणि समाजसुधारणेच्या मंडनापेक्षा मानवी स्वभावातील साध्यासुध्या विसंगतींच्या दर्शनावर भर राहिला. त्यांची निवेदनशैलीही मर्मभेदक कोटित्वापेक्षा मार्मिक व स्वाभाविक संवादांनी नटलेली आहे. त्यामुळे त्यांचे लेखन निबंधरूप होण्याऐवजी त्याला ललित कथेचा घाट प्राप्त झाला व त्यातून मध्यमवर्गीयांचे एक अस्सल व स्वयंपूर्ण विश्व साकार झाले. अशा या सुप्रसिद्ध लेखकाचे २१ नोव्हेंबर १९६३ रोजी निधन झाले. अशा या थोर लेखकाला वंदन!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 19-01-2026 News publication date | Time: 05:55 AM News publication time | Views: 251 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 19-01-2026 News publication date | Time: 05:55 AM News publication time | Views: 251 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement