आझाद हिंद सेनेचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा २३ जानेवारी हा जन्मदिन.
नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती. 'नेताजी' ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी. त्यांनी केलेले कार्य महान आहे. भारताच्या स्वातंत्र्या चळवळीच्या काळात सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून भारतीय सैनिकांना लष्करी बळ दिले. 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा' हे त्यांचे अजरामर वाक्य. त्यांचे कार्य खूप मोलाचे आहे. २३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारा हा लेख...
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक (ओडिशा) येथे झाला. आई प्रभावतीदेवींनी बालवयात त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत महत्त्वाचे आहेत. सुभाषबाबूंवर शालेय वयातच स्वामी रामकृष्ण आणि विवेकानंद यांचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्या दोघांच्याही अनेक ग्रंथांचे वाचन त्यांनी तेव्हा केले होते. मिशन शाळेत गोऱ्या व हिंदी विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणारा भेदाभेद आणि विवेकानंदांचे लेखन यांमुळे त्यांच्यात राष्ट्रप्रेम निर्माण झाले. ते तत्त्वज्ञान विषय घेऊन १९१९ साली पहिल्या वर्गात बीए झाले. त्याच वर्षी वडिलांच्या इच्छेनुसार ते आयसीएस होण्यासाठी इंग्लंडला गेले.
सुभाषबाबूंचे राजकीय गुरू चित्तरंजन दास हे होते. १९२१मध्ये इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या कोलकात्यामधील आगमनावर बहिष्कार टाकण्याची मोहीम आखण्यात आली होती. सुभाषबाबूंनी त्यात पुढाकार घेतला. त्यात त्यांना चित्तरंजन दासांबरोबर सहा महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. तुरुंगात दासांच्या पुरोगामी विचारांचा सुभाषबाबूंवर फार मोठा परिणाम झाला. कारावासानंतर ते काही दिवस बेंगॉल नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि स्वराज्य या वृत्तपत्राचे संपादक होते. ते बंगाल प्रांतिक काँग्रेस परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांनी यूथ लीग स्थापन करून तरुणांना संघटित केले. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांची नियुक्ती झाली. दोघांनी मिळून १९२८ साली इंडिया इंडिपेंडन्स यूथ लीगची स्थापना केली. काही वर्षे राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिल्यावर त्यांनी मे १९३९ रोजी फॉर्वर्ड ब्लॉकची स्थापना केली. ५ जुलै १९४३ रोजी आझाद हिंद फौजेची औपचारिक स्थापना झाली. २१ ऑक्टोबर १९४३ रोजी नेताजींनी आशियातील विविध देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची परिषद भरवून आणि तात्पुरते स्वतंत्र भारत सरकार स्थापन करून स्वातंत्र्य मिळवण्याचा आपला संकल्प पूर्ण केला.
१२ सप्टेंबर १९४४ रोजी रंगूनच्या ज्युबिली हॉलमध्ये हुतात्मा यतिंद्र दास यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेताजी यांनी अतिशय भावविभोर भाषण केले आणि ते म्हणाले, 'आता आपले स्वातंत्र्य निश्चित आहे. परंतु स्वातंत्र्य बलिदानाची मागणी करते. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन.' भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेलेले हे वाक्य देशातील तरुणाईत प्राण फुंकणारे होते. स्वतंत्र भारताच्या अमरत्वाची घोषणा करणारे, भारतमातेचे लाडके नेताजी सुभाषचंद्र बोस १८ ऑगस्ट १९४५ रोजीच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडले असे मानले जाते; मात्र त्यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उकललेले नाही. आझाद हिंद सेनेचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी वेगळ्या पद्धतीने योगदान होते. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाला शतश: प्रणाम!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment