स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी - अमृत महाराष्ट्र

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी

स्मृतिदिनानिमित्त (२४ जानेवारी) अल्पचरित्र...

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी मुख्य फोटो
मुख्य फोटो

काही व्यक्ती पृथ्वीवर एखाद्या विशिष्ट कार्यासाठीच जन्मलेल्या असतात. त्यांना देवाने जणू त्या कार्यासाठीच भूतलावर पाठवलेले असते. असेच एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी. त्यांचे नुसते नाव वाचले तरी त्यांनी गायलेले अभंग मनात रुंजी घालतात. त्यांच्या खड्या, स्पष्ट तरी मोहक आवाजाची जादू कधीच ओसरणार नाही. २४ जानेवारी हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, जाणून घेऊ या, या स्वरभास्कराचा स्वरप्रवास...

महाराष्ट्रातील एक ख्यातकीर्त गायक व संगीतरचनाकार भीमसेन जोशी यांचा जन्म गुरुराज व रमाबाई या दाम्पत्याच्या पोटी कर्नाटक राज्याच्या धारवाड जिल्ह्यातील रोण येथे झाला. बालपणापासून भीमसेन यांना गायनाचे विलक्षण आकर्षण होते. ते आईसोबत कानडी भजने म्हणत. तीव्र नैसर्गिक बुद्धिमता असूनही अभ्यासात त्यांचे मन रमले नाही. शाळेत जाता-येताना वाटेवरील ध्वनिमुद्रिकेच्या दुकानात उ. अब्दुल करीमखाँ यांची झिंझोटी रागातल्या ठुमरीची ध्वनिमुद्रिका व १९३२ साली पं. सवाई गंधर्व (रामचंद्र गणेश कुंदगोळकर) यांची गदगमधील मैफल या किराणा घराण्याच्या दोन गायकांची गायकी ऐकून त्यांनी शास्त्रीय संगीत शिकण्याचा ध्यासच घेतला. त्यांची गाण्याची आत्यंतिक आवड पाहून त्यांच्या वडिलांनी उस्ताद इनायतखाँ यांचे गदगमधील शिष्य अगसरू चन्नाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे भीमसेन यांना गाण्याची शिकवणी सुरू केली. त्यांच्याकडून वर्षभरात २०-२१ रागांशी त्यांचा प्राथमिक परिचय झाला; पण सखोल ज्ञानाची आस त्यांना लागून राहिली. 

गुरूच्या शोधात ते घराबाहेर पडले आणि उपाशी-अर्धपोटी, रेल्वेने विनातिकीट प्रवास करत ग्वाल्हेरला हाफीज अलीखाँ यांच्याकडे (सरोदवादक अमजद अलीखाँ यांचे वडील) पोहोचले. त्यांच्याकडच्या वास्तव्यात मारवा रागाची तालीम आणि कृष्णराव पंडित, कुंडलगुरू बाळाभाऊ उमडेकर व राजाभैया पूँछवाले यांच्याकडच्या श्रवणभक्तीतून गायनाचे मूलभूत संस्कार त्यांना लाभले. त्यानंतर सवाई गंधर्वांकडे त्यांनी निरलसपणे गुरुसेवा करून व अतिशय कष्टाने गानविद्या संपादन केली. पुढे भीमसेनजी लखनौ आकाशवाणी केंद्राचे मान्यताप्राप्त कलाकार झाले. सवाई गंधर्वांची मूळची स्वरप्रधान, आलापचारीची व माफक आक्रमक अशी गायकी भीमसेनांनी अधिक आक्रमक, अधिक गतिमान आणि पहिल्या सुरापासून पकड घेणारी अशी केली. त्यांच्या गायकीच्या या वैशिष्ट्यांमुळेच संगीतेतिहासात त्यांचे स्थान अजरामर झाले आहे. 

धन्य ते गायनीकळा या नाटकाचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले (१९६८). गुळाचा गणपती, बसंतबहार, भैरवी, पतिव्रता, स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. संतवाणी हा अभंगांचा व रंगवाणी हा नाट्यगीतांचा खास आविष्कार, बालमुरलीकृष्णन् या दाक्षिणात्य संगीततज्ज्ञाबरोबरची जुगलबंदी, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबतचे ध्वनिमुद्रण, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात (१९९७) संसदेत सादर केलेले वंदे मातरम्, मिले सूर मेरा तुम्हारा या राष्ट्रैक्याच्या बहुभाषक गीतांतील प्रमुख सहभाग ही त्यांची मैफलींशिवायची गानविविधता आहे. 

पं. भीमसेन जोशी यांना शासनाकडून पद्मश्री (१९७२), पद्मभूषण (१९८५), पद्मविभूषण (१९९९) आणि २००८मध्ये भारतरत्न या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यांव्यतिरिक्त संगीतरत्न (१९७१), संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९७६) इत्यादी सन्मान त्यांना लाभले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ह्यांनी त्यांना सन्मान्य डी. लिट. पदवी त्यांना प्रदान केली. जेम्स बेवरिज व हिंदी कवी गुलजार यांनी त्यांच्या जीवनावर लघुपट बनवला आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात ते अनेक वर्षे गात होते. पुण्यात २४ जानेवारी २०११ रोजी त्यांचे निधन झाले.

आजही त्यांच्या स्वरातील ‘माझे माहेर पंढरी’ हे गाणे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. संगीताची आजन्म सेवा केलेल्या या स्वरभास्कराला शतश: नमन!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-01-2026 News publication date | Time: 02:55 AM News publication time | Views: 103 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-01-2026 News publication date | Time: 02:55 AM News publication time | Views: 103 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement