मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व समजावणारा दिवस - २५ जानेवारी
लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व काय आहे, तो हक्क बजावल्याने काय परिणाम होऊ शकतो, मतदारांची भूमिका कशी महत्त्वाची ठरू शकते, याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दर वर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. जगातील सर्वांत मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी मतदान कसे महत्त्वाचे आहे हे या दिनाच्या निमित्ताने सांगितले जाते.
नागरिकांनी आपल्या मताचा योग्य प्रकारे वापर केला, तर योग्य प्रतिनिधी निवडून जाऊ शकतात आणि त्या माध्यमातून लोकशाही बळकट होऊ शकते. मतदानाच्या हक्काचा वापर करून देशातील नागरिक त्यांच्या भविष्यासाठी योग्य अशा प्रतिनिधीची निवड करू शकतील. २०११पासून देशात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी विविध राजकीय पक्ष आणि केंद्र, तसेच राज्य सरकारांकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एक मतदार म्हणून देशातील नागरिकाला जेव्हा हा हक्क मिळतो, तेव्हा त्यासोबत एक जबाबदारीही येते, ती म्हणजे लोकशाही टिकवण्याची जबाबदारी. आपल्या देशात १८ वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदारयादीत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे. धर्म, जात, वर्ण, संप्रदाय अथवा लिंग या निकषांवर भेदभाव न करता कुणालाही हा अधिकार बजावता येऊ शकतो. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराबाबतची माहिती मिळवण्याचा अधिकार मतदारांना आहे. उमेदवाराची संपत्ती, गुन्हेगारी नोंद, शैक्षणिक पात्रता अशा संदर्भातील माहिती त्यांना मिळू शकते. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट निर्णय दिला आहे.
ज्या ठिकाणच्या मतदारयादीत मतदारांचे नाव आहे, तिथेच त्यांनी मतदान करणे अपेक्षित असते. वास्तव्याचे ठिकाण बदलल्यास मतदाराने नव्या ठिकाणी नावनोंदणी करावी, जुन्या मतदार यादीतून नाव काढण्याचा अर्जही द्यावा. निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी, सुरक्षा व्यवस्थेच्या सेवेतील कर्मचारी आदींसाठी निवडणूक आयोगाकडून पोस्टल व्होटिंग अर्थात पोस्टाद्वारे मतदान करण्याची सोयही असते.
आपण भारताचे सुजाण नागरिक आहोत. त्यामुळे भारताचा नागरिक म्हणून जसे आपले हक्क आहेत, तशीच आपली काही कर्तव्येसुद्धा आहेत. त्यातील एक महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे मतदान करणे हे होय. या दिनानिमित्त आपण हाच संकल्प करू या, की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण शंभर टक्के मतदान करून आपल्या देशाची लोकशाही भक्कम करण्यास हातभार लावू या.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment