नेटके जगण्याची शिकवण देणारा ग्रंथराज दासबोध - अमृत महाराष्ट्र

नेटके जगण्याची शिकवण देणारा ग्रंथराज दासबोध

माघ शुद्ध नवमी अर्थात दासबोध जयंतीनिमित्त या महान ग्रंथाविषयी...

नेटके जगण्याची शिकवण देणारा ग्रंथराज दासबोध मुख्य फोटो
मुख्य फोटो

नेटके जगावे कसे, याची शिकवण देणारा समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेला ग्रंथ म्हणजे दासबोध. शिवथरघळ (जि. रायगड) येथे त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले. माघ शुद्ध नवमी या दिवशी त्या ग्रंथाची निर्मिती पूर्ण झाली. म्हणून या दिवशी दासबोध जयंती साजरी केली जाते.

दासबोध या ग्रंथात समर्थांनी दैनदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श केला आहे. जीवनाला योग्य वळण लागण्यासाठी दासबोधाचे पारायण अनेक जण करतात. ते अमुक एक दिवशीच सुरू करावे असा नियम नाही; मात्र जेव्हा केव्हा याचे वाचन केले जाईल, तेव्हा त्यातील प्रत्येक शब्दाचे चिंतन करायला हवे. तरच त्या ग्रंथवाचनाचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकेल. 

रामाची आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामींनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करून प्रबोधन व संघटन केले. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. त्यांनी १७व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच लागू पडतो. संसार कसा करावा याचे नेमके ज्ञान त्यांनी दिले. सूर्यनमस्कार आणि व्यायामाचे महत्त्व सांगून आरोग्याचा गुरुमंत्रही त्यांनी दिला. मनावर ताबा मिळवल्यास अनेक गोष्टी सुलभ होतात, याचे ज्ञानही रामदासांनी या ग्रंथातून दिले. 

दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक दशकात १० समास आहेत. यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती-पंथ धर्मांच्या स्त्री-पुरुषांना आणि एकंदरीत मानवी मनाला उपदेश केलेला आहे. समर्थांनी दोन वेळा दासबोधाची निर्मिती केली असे म्हटले जाते. पहिला दासबोध ग्रंथ २१ समासांचा होता. नंतरचा दासबोध २०० समासी असल्याचे सांगितले जाते. जुन्या आणि नंतरच्या दासबोधाचे एकत्रीकरण करून त्यावर संपादकीय संस्कार करून तो नव्याने प्रकाशित केला गेला. गुरू-शिष्य संवाद असे दासबोधाचे स्वरूप आहे. या ग्रंथाच्या वाचनाने वाचकाला काय मिळेल, हे सुरुवातीच्या काही ओव्यांमध्ये दिले आहे. मूर्खांची लक्षणे, नवविधा भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह यात केलेला आहे. दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयांचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे. अशा या ग्रंथाचे वाचन सर्वांनी अवश्य करावे. 

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 27-01-2026 News publication date | Time: 12:16 PM News publication time | Views: 107 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 27-01-2026 News publication date | Time: 12:16 PM News publication time | Views: 107 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement