पंजाबचा सिंह म्हणून ओळखले जाणारे थोर क्रांतिकारक लाला लजपतराय यांची २८ जानेवारी ही जयंती. त्या निमित्ताने, त्यांचा अल्प परिचय...
लाला लजपतराय हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर क्रांतिकारक नेते. त्यांचा जन्म २८ जानेवारी १८६५ रोजी पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके (जागराँ तहसील) या गावी झाला. लजपतरायांनी मिशन हायस्कूलमधून शिक्षण घेऊन पुढे (१८८६) एलएलबी पदवी मिळवली आणि अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून त्यांनी ओळख प्राप्त केली.
पुढे १८९२ साली त्यांनी लाहोरला स्थायिक होऊन तेथे वकिली सुरू केली. १९०४मध्ये त्यांनी ‘पंजाबी’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. ते पुढे प्रसिद्ध झाले. पंजाबचे प्रतिनिधी म्हणून ते काँग्रेस अधिवेशनाला गेले. तेथे त्यांचा एवढा प्रभाव पडला, की ब्रिटिशांसमोर हिंदी जनतेची कर्झनशाहीतील दुःखे व किमान राजकीय मागण्या मांडण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मोहम्मद अली जिना आणि गो. कृ. गोखले यांच्याबरोबर लालाजींचीही निवड झाली. लाला लजपतराय यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अनेक आंदोलने केली. त्यांच्या ‘पंजाबी’ या वृत्तपत्रातून अनेक लेख लिहिले. लालाजींना पंजाबचा सिंह म्हणून गौरवण्यात येऊ लागले. जालियनवाला बाग हत्याकांडाने व्यथित होऊन लाला लजपतराय इंग्लंडहून परत आले.
१९२८च्या फेब्रुवारीमध्ये सायमन कमिशनवर सर्व ब्रिटिश सदस्य नेमल्याबद्दल सरकारचा निषेध करणारा ठराव केंद्रीय असेंब्लीत लजपतरायांनी मांडला होता. तो बहुमताने संमत झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला पंजाबमध्ये ते कमिशन आल्यावर लालाजींनीच निदर्शनाचे नेतृत्व केले. त्यातील जबर मारहाणीने ते आजारी पडले आणि त्यातच १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. महिन्याभरात भगतसिंग आदी क्रांतिकारकांनी साँडर्सची हत्या करून लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतला. अशा या थोर क्रांतिकारकाला शतश: नमन!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment