कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो.
कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट आहे.
पॅरिसमध्ये २००० साली झालेल्या जागतिक परिषदेत कर्करोगविषयक मसुदा मांडण्यात आला. या परिषदेत जगभरातील शासकीय उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्करोगविषयक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी पॅरिसच्या कर्करोगविषयक सनदेला मान्यता दिली. ही सनद कर्करोगाशी संबंधित संशोधन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याकरिता आर्थिक गुंतवणूक करणे, कर्करोगग्रस्त रुग्णांचे जीवनमूल्य उंचावणे, तसेच त्यांच्यावर योग्य उपचार करणे अशा तत्त्वांचा पुरस्कार करते. सनदेच्या दहाव्या कलमात अधिकृतरीत्या चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून जाहीर केला गेला.
कर्करोगविषयक उपलब्ध माहिती, तसेच कर्करोगाचे निदान आणि उपचार यांत झालेली लक्षणीय प्रगती यांमुळे रोगप्रसारामध्ये कपात होणे अपेक्षित आहे. परंतु जागतिक आकडेवारीनुसार दर वर्षी कर्करोगाचे नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कर्करोगाच्या माहितीचा प्रसार करून कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते. यासाठी कर्करोग प्रतिबंधात्मक उपायांविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने जगभरातील कर्करोग संस्था आणि आरोग्य संघटना जागतिक कर्करोग दिवस साजरा करतात. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे ७० टक्के मृत्यू अल्पविकसित देशांमध्ये होत असल्याकारणाने अशा ठिकाणी कर्करोग आणि त्याचा प्रतिबंध याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक कर्करोग दिवस हे एक महत्त्वाचे साधन आहे. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्करोगावर नियंत्रण राखण्यासाठी आणि पर्यायाने जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी कार्यशील असते.
आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग दिवसाचे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना जागतिक कर्करोग दिवसानिमित्त कर्करोगाशी निगडित रूपरेखा जाहीर करते. या रूपरेखेला अनुसरून विविध आरोग्य संस्था आणि कर्करोग उपचार केंद्र यांद्वारे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. या संस्थांद्वारे त्यांच्या संकेतस्थळांवर कर्करोगाविषयी माहिती प्रसारित केली जाते. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना स्थानिक आरोग्य संस्थांच्या साह्याने संमेलने, व्याख्याने, प्रदर्शने, तसेच निधी उभारणी कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते.
जागतिक कर्करोग दिवसानिमित्त सामूहिक आणि वैयक्तिक प्रयत्नांतून कर्करोगाचा जनजीवनावरील परिणाम कमी करता येऊ शकतो. कर्करोगाबाबत गैरसमज दूर करणे, कर्करोग हा रोखता येण्यासारखा आजार आहे, कर्करोगाविषयी वैयक्तिक बांधिलकी अशा विविध विषयांना अनुसरूनदेखील रूपरेखा योजण्यात येतात. निरोगी जीवनशैली, व्यायाम, ताणतणाव नियंत्रण यांद्वारे हा आजार टाळता येऊ शकतो. आपण जितके जास्त निसर्गाशी एकरूप होऊन जगू, तेवढेच कर्करोगाला दूर ठेवणे शक्य आहे. यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे, घरचे ताजे आणि साधे अन्न खाणे, आपल्या पारंपारिक आणि घरगुती भोजनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
खरे तर आपले सारे सण-उत्सव यामध्ये जे आचरण आणि भोजन परंपरेने आपण करतो तेच योग्य आहे. या सगळ्यामागे विज्ञान आहे, ऋतुचक्राप्रमाणे आहारात बदल सुचवलेला असतो. तेव्हा हे सगळे डोळसपणे आपल्या आयुष्यात अवलंबणे, हाच कर्करोगाला आणि इतर आजारांना दूर ठेवण्याचा, निरामय आयुष्य जगण्याचा एकमेव मार्ग आहे. तेव्हा काळजी घ्या, काळजी करू नका!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment