शक्ती आणि मनाच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा ज्ञानयोगी
आजचे जग अस्थिर आहे. आपण दररोज विविध माध्यमांतून या अस्थिरतेची उदाहरणे पाहतो. आत्महत्या, हत्या, मारामारी, युद्ध अशी अनेक उदाहरणे दररोज घडत असल्याचे आपण ऐकतो, वाचतो. आपण जसेजसे शिक्षित होत आहोत, आर्थिक मुबलकता येत आहे, तसतसे आपले मन अस्थिर का आहे? संपूर्ण जगात एक वेगळीच अस्वस्थता आहे. माणूस समाधानी का नाही? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळते ते मनाच्या श्लोकांत. आपल्या मनाचा चंचलपणा, उद्वेग, चिंता या सगळ्याचे निदान मनाच्या श्लोकांतून होते. तो एकेक श्लोक आपल्या मनातली कोडी आपल्यासमोर उलगडतो. या श्लोकांचे जनक समर्थ रामदास अर्थात रामदासस्वामी यांचा स्मृतिदिन माघ कृष्ण नवमीला असतो. तो दिवस रामदासनवमी किंवा दासनवमी म्हणून ओळखला जातो. त्या निमित्ताने या महान ज्ञानयोगीचा हा अल्प परिचय...
समर्थ रामदासांचा जन्म मराठवाड्यातील जांब या लहानशा गावी ठोसर घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत, आईचे नाव राणूबाई. राम आणि सूर्य यांची उपासना त्यांच्या घरात होती. सूर्याजीपंत अनेक मुमुक्षूंना अनुग्रह देत. रामदासांचे वडील बंधू गंगाधर 'श्रेष्ठ' आणि 'रामी रामदास' या नावांनीही ओळखले जातात. रामदास आठ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले आणि गंगाधर हे वडिलांचा संप्रदाय चालवू लागले. रामदास यांना प्रत्यक्ष रामचंद्रांनीच स्वप्नात येऊन 'श्रीराम जय राम जय जय राम' हा त्रयोदशाक्षरी म्हणजे १३ अक्षरी मंत्र दिला. आई आणि वडील बंधू यांनी रामदासांची इच्छा नसतानाही त्यांचे लग्न ठरवले; पण मंगलाष्टकांमधले 'सावधान' हे शब्द ऐकताच भर लग्नमंडपातून ते पळून गेले, असे म्हटले जाते.
त्यानंतर तपश्चर्येसाठी ते नाशिकला गेले आणि नाशिजवळील टाकळी या गावी असलेली एक गुहा त्यांनी त्यासाठी निवडली. राममंत्राचा तेरा कोटी जप, वेदशास्त्रे, वेदान्त, काव्ये, पुराणे यांचा अभ्यास, गायत्री पुरश्चरणे, संगीतसाधना त्यांनी येथेच केली. त्यानंतर १६३२मध्ये ते भारतभ्रमणाला निघाले. काशी, प्रयाग, गया, अयोध्या, श्रीनगर, हिमालयातील बद्रिनारायण आणि केदारनाथ अशी अनेक ठिकाणे त्यांनी पाहिली. अयोध्येत त्यांचे वास्तव्य सर्वाधिक म्हणजे अकरा महिने होते. पंजाबात जाऊन ते तेथील शीख धर्मगुरूंना भेटले. मानसरोवराची प्रदक्षिणा केली. पुरीच्या जगन्नाथाचे दर्शन घेतले. दक्षिणेतीलही अनेक तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या. महाराष्ट्रातही ते हिंडले. या प्रवासात समर्थांनी अनेक साधूमहात्म्यांच्या भेटी घेतल्या. राम, हनुमान यांची मंदिरे उभी केली. मठ स्थापन केले. समर्थांच्या आयुष्यातील या यात्रापर्वात त्यांना भारताच्या लोकस्थितीचे दर्शन घडले. ते झाल्यानंतर समाजातील अराजक मोडावे, खऱ्या परमार्थाची स्थापना करावी आणि ऐहिक पुरुषार्थ साधणारी समाजव्यवस्था घडवावी, ही त्यांची उद्दिष्टे होती. ती पूर्ण करण्यासाठी ते १६४४ साली कृष्णातीरी आले. हे त्यांच्या आयुष्यातील अखेरचे पर्व.
या पर्वात ते राजकारण म्हणजेच धर्मसंस्थापनेचे कार्य अखेरपर्यंत करत राहिले. समर्थांना अभिप्रेत असलेला राजा हा परमार्थ संस्थापक आणि सज्जनांचा रक्षक असा होता. अशा राजाचे राज्य हे त्यांच्या दृष्टीने रामराज्य होते. अशा रामराज्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी निर्माण करणे, म्हणजेच समर्थ करू पाहत असलेली धर्मसंस्थापना होती. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होत. शिवाजी महाराजांच्या राजकीय उलाढालींमध्ये रामदासांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, हे जरी खरे मानले, तरी शिवाजी महाराजांनी हाती घेतलेल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्याला अनुकूल अशी मनोवृत्ती रामदासांनी लोकांमध्ये निर्माण केली, हे दिसून येते.
इस्लामी राजवटीत, भयापोटी लोकांनी डोहांमध्ये वा नद्यांमध्ये बुडवलेल्या अनेक देवतामूर्ती बाहेर काढून रामदासांनी त्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली. धर्मप्रचारासाठी देवळे बांधली. देवांचे सार्वजनिक उत्सव सुरू केले. परमार्थाचा अधिकार पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही आहे, असे रामदास मानत. अक्काबाई आणि वेणूबाई या त्यांच्या अनुयायी स्त्रिया प्रसिद्ध आहेत. त्यांच्याखेरीज अन्य अनेक स्त्रियांनी रामदासांचे अनुयायीत्व स्वीकारले होते. त्यांत काही मुसलमान फकीरही होते. समर्थांच्या पट्टशिष्याचे नाव कल्याण, त्याचे मूळ नाव अंबाजी. तो त्यांचा मुख्य लेखनिक होता. दिनकरस्वामी, गिरिधर इत्यादी त्यांचे अन्य शिष्यही प्रसिद्ध आहेत.
समर्थांनी चाफळ येथे श्रीरामाची स्थापना केली. दासबोध आणि रामायण (दोन कांडे) हे समर्थ रामदासांनी रचलेले दोन प्रमुख ग्रंथ. दासबोध हा त्यांचा आणि रामदासी संप्रदायाचाही प्रमुख ग्रंथ आहे. माणसांमध्ये सद्गुणांची वाढ व्हावी, लोक कर्तृत्वसंपन्न आणि परमार्थप्रवण व्हावेत, ही तळमळ दासबोधात दिसते. रामदासी रामायणाची 'सुंदर' आणि 'युद्ध' अशी दोनच कांडे आहेत. समग्र रामायण रामदासांनी लिहिले नाही. सुंदरकांडाची श्लोकसंख्या १०१ असून, युद्धकांडातील एकूण श्लोक १३६२ इतके आहेत. स्फुट कविता, प्रासंगिक कविता, 'आत्माराम'सारखी वेदान्त प्रकरणे, अभंग, श्लोक, भूपाळ्या इत्यादी अन्य बऱ्याच रचना समर्थांनी केल्या. करुणाष्टक, मनाचे श्लोक, 'सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी' ही महाराष्ट्रात घरोघरी म्हटली जाणारी श्री गणेशाची आरती या त्यांच्या रचना तर विख्यात आहेत.
रामदासांनी 'समर्थ' होण्यापूर्वी तपश्चर्या केली, बहुश्रुतपणा मिळवला. या साधनेत निराशेचे क्षणही अनेकदा आले. अशा प्रासंगिक निराशेचे व उद्वेगाचे प्रतिबिंब त्यांच्या करुणाष्टकांत पडलेले आढळते. मनाच्या श्लोकांचा उर्दू अनुवाद शहा तुराव चिश्ती या इस्लाम धर्मीयाने सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी केला आहे. रामदासांनी संगीताभ्यास केला होता. केदार, बागेश्री, आसावरी, काफी अशा विविध रागांमध्ये त्यांनी बांधलेली पदे, त्यांच्या काही पदांतून आढळणारे तबल्याचे किंवा नृत्याचे बोल यांतून हे लक्षात येते. श्री समर्थ रामदासस्वामींनी १६८२ साली माघ कृष्ण नवमी या दिवशी सज्जनगडावर देह ठेवला. त्याच दिवशी रामदासनवमी साजरी केली जाते. समर्थ रामदासस्वामींना कोटी कोटी प्रणाम!
(संदर्भ - मराठी विश्वकोश)
Comments 3 Comments
Kailas Nikumbh
खूप छान लेख आहे. थोडक्यात समग्र रामदास सांगितले. रामदासस्वामी यांना कोटी कोटी प्रणाम.
सतीश जोशी
सुंदर माहिती .प्रेरणा दायी लेख. जय जय रघुवीर समर्थ
Milind Kulkarni
खूपच छान लेख लिहिला आहे. श्री रामदासस्वामी यांच्या जीवनाचा पहिल्यापासून शेवट पर्यंत घेतलेला आढावा माहितीपूर्ण आहे.
शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे l
वसिष्ठपरी ज्ञान योगेश्वराचे l
कवी वाल्मिकी सारखा मान्य ऐसा l
नमस्कार माझा सदगुरू रामदासा ll
Write a Comment