गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील यशोगाथा
तिरोडा (जि. गोंदिया) : बाजारपेठेची गरज ओळखून एखादा व्यवसाय सुरू करणे, तो चालवणे आणि नावारूपाला आणणे हे येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी सातत्य आणि चिकाटी लागते. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात ज्यांनी आपल्या वेगळ्या व्यवसायाने अशी ओळख तयार केली ते म्हणजे ज्यूसवाले जोशी. आता ते आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवणार असून, त्याला एक नवा आयाम देणार आहेत. त्यात त्यांना साथ मिळणार आहे ती अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेची.
तिरोडा येथे शिक्षक सुनील प्रभाकर जोशी यांनी एक वेगळे धाडस करून ज्यूसचा व्यवसाय सुरू केला आणि तो नावारूपाला आणला. त्यांचे चिरंजीव इंजिनीअरिंग पूर्ण करून लाखोंची नोकरी सोडून उभारलेला स्वतःचा व्यवसाय अधिक विस्तारण्यासाठी अमृत संस्थेकडून बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला एक वेगळा आयाम प्राप्त होणार आहे.
जोशी म्हणाले, 'आजच्या स्पर्धात्मक युगात व्यवसाय टिकवण्यासाठी केवळ मेहनत नाही तर योग्य प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. अमृत संस्थेचे बेकरी प्रशिक्षण व्यवसायाला डायनॅमिक बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.'
फ्रूट ज्यूस सेंटर आणि डेली नीड्स या नावाचा त्यांचे दुकान संपूर्ण तिरोडा तालुक्यात प्रसिद्ध आहे. आता बेकरी उत्पादनांद्वारे ते आपल्या ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देणार आहेत. केक, ब्रेड, पफ, बिस्किटे आदी दर्जेदार उत्पादनेही ग्राहकांना त्यांच्याकडे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत.
अमृत संस्थेतर्फे दिले जाणारे व्यावसायिक प्रशिक्षण, मार्गदर्शन व उद्योजकतेला चालना देणाऱ्या योजना ग्रामीण व शहरी युवकांसाठी आशेचा किरण ठरत आहेत. जोशी यांचा हा निर्णय अनेक सुशिक्षित युवकांना 'नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय हा खरा विकासाचा मार्ग आहे' हा संदेश देणारा ठरणार आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment