सुनीता विल्यम्स - अमृत महाराष्ट्र

सुनीता विल्यम्स

अंतराळातील भारतकन्या

सुनीता विल्यम्स मुख्य फोटो
मुख्य फोटो

उंच आकाशात पाहिले, की आपल्याला प्रश्न पडतात, की या आकाशाच्या पल्याड काय असेल, निळ्या आभाळानंतरची ती काळी, निर्वात पोकळी कशी दिसते, पृथ्वीबाहेरचे हे अनंत अवकाश कोठे संपत असेल का, इत्यादी इत्यादी... या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एका धाडसी महिलेने अंतराळवीर व्हायचे ठरवले. कल्पना चावला हिची अधुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी ती सरसावली. या भारतकन्येने अंतराळात जाऊन अनेक महत्त्वपूर्ण शोध लावले. त्या शूर कन्येचे नाव सुनीता विल्यम्स... २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी नुकतीच 'नासा'मधून निवृत्ती घेतली आहे. त्या निमित्ताने, त्यांच्या या उत्तुंग प्रवासाविषयी ही थोडक्यात माहिती....

सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या प्रसिद्ध अमेरिकन अंतराळवीर आणि अमेरिकन नौदलाच्या माजी अधिकारी आहेत. त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९६५ रोजी युक्लिड (ओहायो, अमेरिका) येथे झाला. त्यांचे वडील डॉ. दीपक पंड्या हे भारतीय (गुजरात) आणि आई बोनी या स्लोव्हेन-अमेरिकन. त्यांनी अमेरिकन नेव्हल अकादमीतून पदवी आणि फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. १९९८मध्ये त्यांची अंतराळवीर म्हणून नासा या जगप्रसिद्ध संस्थेत निवड झाली. त्यांनी नासाच्या तीन अंतराळ मोहिमांमध्ये सहभाग घेतला. या तीन मोहिमांमध्ये मिळून एकूण ६०८ दिवस त्यांनी अंतराळात व्यतीत केले आहेत. 

त्यांनी एकूण नऊ वेळा स्पेसवॉक केला असून, त्यासाठी ६२ तास आणि सहा मिनिटे खर्च केली आहेत. महिला अंतराळवीरांमध्ये हा एक मोठा विक्रम आहे. अंतराळात मॅरेथॉन धावणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. जून २०२४मध्ये त्या 'बोइंग स्टारलायनर' मोहिमेवर गेल्या होत्या. तांत्रिक बिघाडामुळे त्या सुमारे नऊ महिने अंतराळात होत्या आणि १९ मार्च २०२५ रोजी सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या. त्यांनी अंतराळात जाताना सोबत भगवद्गीता, गणपतीची मूर्ती आणि समोसे नेले होते. त्यामुळे त्या भारतात विशेष चर्चेत राहिल्या. 

अंतराळात असताना सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांनी अनेक अडचणींना तोंड दिले; मात्र शेवटपर्यंत त्यांनी जिद्द कायम ठेवली. त्यांनी नुकतीच भारताला भेट दिली. 'अंतराळातून पाहिल्यास भारत खूप प्रभावी दिसतो. रात्रीच्या वेळी शहरांमधील प्रकाशाचे जाळे, जणू काही मज्जातंतू एकमेकांशी जोडलेले असावेत, असे वाटते,' असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी भारताच्या वेगवान वैज्ञानिक प्रगतीचे आणि अंतराळ कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. भारतात आल्यावर घरी परतल्यासारखे वाटते, असे त्या म्हणतात.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 29-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 29-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement