१० दिवसांच्या कार्यक्रमातून मिळाले उद्योग उभारणीला बळ
जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेतर्फे जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या अमृत उद्योग कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा १९ फेब्रुवारीला समारोप झाला. १० दिवसांच्या या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील युवक-युवती व उद्योजकांना नवी दिशा मिळाली आहे.
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी अमृत ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणात उद्योग उभारणीच्या मूलभूत संकल्पना, योग्य व्यवसायाची निवड, उत्पादन प्रक्रिया, खर्च नियंत्रण, नफा व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग व ट्रेडमार्क नोंदणी, तसेच विविध शासकीय योजनांचा प्रभावी वापर याबाबत तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल युगाची गरज लक्षात घेऊन अमृतपेठ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची माहिती देण्यात आली. त्यामुळे जालना जिल्ह्यातील उत्पादनांना राज्यभर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
समारोप कार्यक्रमाला अमृत संस्थेचे जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे, उपव्यवस्थापक चिंतेश जोशी, तसेच अमृतमित्र सत्यम अग्रवाल उपस्थित होते. 'हे प्रशिक्षण केवळ मार्गदर्शनापुरते मर्यादित नसून, प्रत्यक्ष उद्योग उभारणीसाठी आत्मविश्वास निर्माण करणारे ठरणार आहे. जिल्ह्यात स्वावलंबी उद्योजक घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरेल,' असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी सांगितले, की 'प्रशिक्षण संपल्यानंतरही अमृत संस्था त्यांच्या उद्योग प्रवासात कायम सोबत राहील. व्यवसाय सुरू करताना किंवा विस्तार करताना येणाऱ्या अडचणींवर संस्थेकडून सातत्याने मार्गदर्शन, समन्वय व सहकार्य केले जाईल.'
या कार्यक्रमामुळे जालना जिल्ह्यात उद्योजकतेची चळवळ अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, अमृत संस्थेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment