नागपूरच्या महापौर सौ. नीता ठाकरे यांचे प्रतिपादन
नागपूर : 'अमृत संस्थेच्या अमृतपेठ थेट बाजारपेठ या उपक्रमामुळे स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायांना चालना मिळेल आणि नागरिकांना दर्जेदार सेवा व सवलतींचा लाभ मिळेल,' असे मत नागपूरच्या महापौर सौ. नीता ठाकरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. अमृतपेठ थेट बाजारपेठ हाही त्यापैकीच एक उपक्रम आहे. या उपक्रमाचा प्रसार व जनजागृतीसाठी अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे यांनी नागपूरच्या महापौर सौ. नीता ठाकरे यांची भेट घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या वेळी अमृतपेठ उपक्रमाची सविस्तर माहिती महापौरांना देण्यात आली. उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे, कार्यपद्धती, तसेच स्थानिक बाजारपेठ आणि सर्वसामान्य नागरिकांना होणारे लाभ याबाबत सादरीकरण करण्यात आले. आगामी कार्यक्रमासाठी महापौरांना निमंत्रणही देण्यात आले.
या वेळी त्यांनी अमृतपेठ उपक्रमाची माहिती बारकाईने समजून घेतली आणि कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. अमृतपेठ उपक्रमामुळे स्थानिक बाजारपेठेचा विकास होणार असून, नागरिकांना सुविधा आणि व्यापाऱ्यांना नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे अमृत संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
महापौर सौ. ठाकरे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून, हा उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, असे मत व्यक्त केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment