अमृतच्या विविध योजनांद्वारे युवक-युवतींना कौशल्य विकास, उद्योग, उद्योजकता, स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अर्थसहाय्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत शहरातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळा अकोला यांच्यापुढे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेमार्फत युवक-युवतींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली. अमृत सखी कु. प्राची देव यांनी उपस्थित युवक-युवती व नागरिकांना संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण, अर्थसहाय्य व रोजगाराभिमुख योजनांची सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृतमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये स्पर्धा परीक्षा प्रोत्साहनासाठी अर्थसहाय्य, रोजगारक्षम कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक अर्थसहाय्य, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास तसेच उद्योजकांसाठीच्या विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून पात्र उमेदवारांना शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्यविकास तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच युवक-युवतींना रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी अमृतच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. त्याचबरोबर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठीही संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. जिल्ह्यातील पात्र युवक-युवती, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि होतकरू उमेदवारांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन कु. प्राची देव यांनी यावेळी केले. ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत राज्यभरात दि. १६ ते २४ सप्टेंबरदरम्यान शासनाच्या विविध विभागांच्या योजना व उपक्रमांची जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती त्यांच्या परिसरातच मिळत आहे. कार्यक्रमाला न्यू आझाद गणेश मंडळाचे पदाधिकारी श्री. अग्रवाल, सदस्य व कार्यकर्ते, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील महिला, पुरुष, लहान मुले आणि नागरिक उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment