वेडात मराठे वीर दौडले सात! - अमृत महाराष्ट्र

वेडात मराठे वीर दौडले सात!

प्रतापराव गुजर यांच्यासह सात सरदारांनी नेसरीच्या लढाईत आपल्या प्राणांची आहुती दिली तो दिवस म्हणजे २४ फेब्रुवारी...

वेडात मराठे वीर दौडले सात! मुख्य फोटो
मुख्य फोटो

आपला भारत आणि त्या भारतातील भारतवेडे वीर. प्रत्येक भारतवेड्याचे युद्ध वेगळे, पराक्रम वेगळा, परिस्थिती वेगळी, शत्रू वेगळा; पण भावना एकच - 'मी शिल्लक राहिलो, नाही राहिलो, तरी फरक पडत नाही. ही मातृभूमी राहिली पाहिजे. हा देश राहिला पाहिजे.' महाराष्ट्रात तर असे असंख्य अनाम वीर आहेत. त्यांच्या शौर्याची गाथा कोणी लक्षात ठेवावी म्हणून ते लढले नाहीत. ते फक्त लढले, निकराने लढले, शेवटच्या श्वासापर्यंत लेढले. त्यांच्या या नि:स्वार्थ बलिदानाने ते कित्येक पिढ्यांच्या लक्षात राहिले. आजच्या भारताचे अस्तित्व याच अशा किती तरी अनाम वीरांमुळे आहे.

महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने महान राष्ट्र बनवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने व शेकडो मावळ्यांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले. महाराजांशी निष्ठा व स्वराज्यासाठीची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसानसांत भिनली होती. असेच सात वेडे वीर आणि त्यांच्या बलिदानाची ही गाथा... सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४. या वेळी त्यांच्यासोबत सरदार विसाजी बल्लाळ, दीपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी शिंदे होते. या सात जणांनी खानाच्या सैन्याशी निकराचा लढा दिला; मात्र सातही जणांना वीरमरण आले. 

प्रतापरावांचे मूळ गाव रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील ताम्हाणे उर्फ गोरेगाव हे होते. प्रतापरावांचे मूळ नाव कडतोजी. शिवरायांच्या सैन्यातील एक शिलेदार म्हणून काम करतच पराक्रमाच्या व जिद्दीच्या जोरावर ते स्वराज्याचे सरनोबत झाले. कडतोजींचा पराक्रम पाहून त्यांना प्रतापराव किताब देऊन गौरवण्यात आले होते. उमराणीच्या लढाईत प्रतापरावांकडून अभय मिळालेला बहलोलखान पुन्हा स्वराज्यात धुमाकूळ घालू लागला होता. राज्याभिषेक सोहळा जवळ येत असतानाच 'खान पुन्हा स्वराज्यावर चालून येत आहे. वेळीच त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका,' अशा आशयाचा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठवला. आपल्या प्राणापेक्षा प्रिय असणाऱ्या महाराजांचा हुकूम पाळायचा या उद्देशाने प्रतापराव गुजर संधी शोधत होते. एके दिवशी ते आपल्या सहा सरदारांसोबत फेरफटका मारायला निघाले असताना बहलोलखान जवळच असल्याचे त्यांना समजले. प्रतापराव याच संधीची वाट पाहात होते. ते त्यांच्या सहा शिलेदारांसह नेसरी खिंडीत तळ ठोकून बसलेल्या बहलोलखानाच्या सैन्यावर अक्षरश: तुटून पडले. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. 

२४ फेब्रुवारी १६७४ ला या सात मराठ्यांनी स्वराज्यरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन नेसरी खिंड पावन केली. त्यांच्या या पराक्रमावर कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे अतिशय सुंदर गाणे रचले आहे. आजही हे गाणे ऐकले की प्रतापराव गुजर आणि त्यांचे वीर यांची नेसरीची ती झुंज डोळ्यांसमोर उभी राहते आणि अंगावर रोमांच उभे राहतात. रक्त सळसळते. त्यांच्या या अतुलनीय पराक्रमाची साक्ष म्हणून नेसरी येथे प्रतापराव गुजर यांची समाधी बांधण्यात आली आहे. तिथे भव्य व आकर्षक समाधिमंदिर बांधलेले आहे. जवळच शिवमंदिर आणि क्रांती स्तंभ आहे. तिथेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. नेसरी बसस्थानक परिसरात प्रतापराव गुजर यांचा अश्वारूढ पुतळासुद्धा आहे. या सात स्वातंत्र्यवेड्या वीरांना आणि त्यांच्या पराक्रमाला शतश: वंदन!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-02-2026 News publication date | Time: 03:54 AM News publication time | Views: 155 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-02-2026 News publication date | Time: 03:54 AM News publication time | Views: 155 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement