उद्योजिका जयश्री कुलकर्णींच्या प्रेरक मुलाखतीने कार्यक्रमाला रंगत
नाशिक : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नाशिक कार्यालयात महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लघुउद्योजिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. आपल्या विविध योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून अमृत ही संस्था उद्योजक घडवण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. म्हणूनच महिला दिनानिमित्त लघुउद्योजिकांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. तसेच, ज्येष्ठ उद्योजिका जयश्री कुलकर्णी यांच्या प्रेरक मुलाखतीने कार्यक्रमाला रंगत आणली.
निखिल जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर भारतमाता पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांनी उपस्थित उद्योजिकांना आपापल्या व्यवसायांची वृद्धी करण्यासाठी त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या वेळी ज्येष्ठ उद्योजिका जयश्री कुलकर्णी, 'लोकसत्ता'च्या ज्येष्ठ पत्रकार चारुशीला कुलकर्णी आणि कल्याण जनता सहकारी बँकेच्या व्यवस्थापिका दीपाली उमरेडकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. खाडिलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सामान्य महिला ते यशस्वी उद्योजिका ही वाटचाल जयश्री कुलकर्णी यांनी कशी केली, त्यांचा प्रवास कसा होता, हे उपस्थितांना त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेता आले. या प्रवासात आलेली विविध स्वरूपाची आव्हाने, एक महिला म्हणून समाजातील काही घटकांद्वारे करण्यात आलेले खच्चीकरण यावर मात करून कुलकर्णी यांनी एकटीने आपल्या मुलांची जबाबदारी सांभाळून महत्त्वाकांक्षी उद्योजिका होऊ पाहणाऱ्या महिलांपुढे आदर्श निर्माण केला आहे. 'महिलांनी सरकारी किंवा व्यावसायिक कामांसाठी वैयक्तिक पातळीवर कुठेही एक रुपयाही लाच म्हणून देऊ नये. त्यातून देशाच्या प्रगतीतील आपल्या योगदानाचे समाधान वेगळेच असेल,' असे आवाहन त्यांनी केले. 'अमृत महाराष्ट्र' या 'अमृत'च्या मुखपत्राच्या प्रतिनिधी कौमुदी परांजपे यांनी ही मुलाखत घेतली.
अनिष्ट प्रथांना थारा न देता स्त्री सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकून समाजाचा दृष्टिकोन बदलून सुज्ञ नागरिक घडवावेत, असा विचार चारुशीला कुलकर्णी यांनी या वेळी मांडला. कल्याण जनता सहकारी बँकेच्या उद्योजिकांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध योजनांचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन दीपाली उमरेडकर यांनी केले.
नुकत्याच पार पडलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमात सहभागी झालेल्या उद्योजिकांना या वेळी प्रशस्तिपत्रक आणि आवळ्याचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. 'निसर्ग जोपासावा व वाढवावा' या उद्देशाने या समारंभाचे पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. निखिल जोशी यांनी केलेल्या आभारप्रदर्शनानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment