मानोरा येथे महिला दिनानिमित्त 'अमृत'तर्फे विशेष बैठक
मानोरा (वाशिम) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आणि योजना राबवल्या जातात. उद्योजक घडवण्यावर संस्थेचा जास्त भर आहे. या पार्श्वभूमीवर, वाशिम जिल्ह्यात मानोरा येथे महिला दिनाच्या औचित्याने श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाची बैठक घेण्यात आली.
अमृत संस्थेचे वाशिम जिल्ह्याचे उपव्यवस्थापक रोहित देशमुख यांनी या वेळी महिलांना उद्योजकतेसंदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन केले. महिलांनी या दिवसाच्या औचित्याने संकल्प करून नवीन व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन करतानाच नवीन व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक ती पूर्ण मदत अमृत संस्थेकडून केली जाईल, असे आश्वासन देशमुख यांनी दिले. महिलांनी उद्योजक होऊन स्वतःचा विकास साधावा आणि स्वप्ने पूर्ण करावीत, असेही देशमुख म्हणाले. बैठकीला महिला मोठ्या उत्साहाने उपस्थित होत्या. महिलांसाठीच्या आणि स्वयंरोजगारासाठीच्या शासनाच्या सर्व योजनांची माहिती त्यांनी घेतली. अमृत संस्थेच्या पाठबळाने लवकरच उद्योजक होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment