राजस्थानी मारवाडी समाज आणि ब्राह्मण समाजाने दर्शवली उत्सुकता
अचलपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या विविध योजनांची माहिती लक्ष्यित गटातील नागरिकांना देण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यामध्ये राजस्थानी मारवाडी समाज व ब्राह्मण समाजाच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सुमारे १०० नागरिक आणि उद्योजक उपस्थित होते. त्यात औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींचाही समावेश होता.
या बैठकीला अमृत संस्थेचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, जिल्हा उपव्यवस्थापक ऋषिकेश कथलकर उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना विविध योजनांची माहिती दिली. अमृत कौशल्यविकास योजना, अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम, अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम, अमृत निर्यात प्रोत्साहन योजना अशा अनेक योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच अमृत संस्थेतर्फे उद्योजक घडवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या इतर प्रशिक्षणविषयक संधींबाबत माहिती देण्यात आली.
उपस्थितांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. उद्योजकता वाढीसाठी व स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी अमृत संस्थेच्या योजनांचा कसा लाभ घेता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाली. जास्तीत जास्त नागरिकांनी अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा व उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे, असे आवाहन कोळेश्वर आणि कथलकर यांनी केले. उपस्थितांनी अमृत संस्थेच्या योजनांबद्दल उत्सुकता दाखवून लाभ घेण्याची इच्छा व्यक्त केली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment