योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यास होणार मदत
पालघर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. अमृत संस्थेचे कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंत आणि मुंबई जिल्हा व्यवस्थापक राजेश पवार यांनी संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता पालघर जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या.
या वेळी कोळगावमधील आदर्शनगरमध्ये सदानंद तथा नंदू पावगी यांच्या घरी एक छोटेखानी बैठक घेण्यात आली. नंदू पावगी गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात आहेत. संस्थेच्या लक्ष्यित गटात त्यांचा दांडगा संपर्क आहे. अमृत संस्थेच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी पावगी यांच्यासह शशांक मनोहर, सौरभ पावगी, सीमा पावगी, श्री. फडके आणि लक्ष्यित गटातील अन्य बांधव उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment