दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या स्टॉल्ससह चविष्ट, रुचकर खाद्यपदार्थांचेही असणार स्टॉल्स
अहिल्यानगर : स्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे 'अमृतपेठ - थेट बाजारपेठ' हा विशेष उपक्रम राबवला जातो. आतापर्यंत राज्यातील विविध शहरांमध्ये या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, आता हा उपक्रम अहिल्यानगर शहरात राबवला जाणार आहे. येत्या १४ आणि १५ मार्चला या उपक्रमाचा लाभ अहिल्यानगरकरांना घेता येणार आहे.
अहिल्यानगरमधील अमृतपेठ थेट बाजारपेठेत एकूण २६ स्टॉल्स असतील आणि त्यापैकी २०हून अधिक स्टॉल्स महिला उद्योजकांचे असतील. या ठिकाणी ग्राहकांना विविध प्रकारची स्वदेशी व घरगुती उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये विविध प्रकारचे मसाले, रेडी फूड पॅकेट्स, विविध प्रकारचे फ्लोअर क्लीनर, इमिटेशन ज्वेलरी, हँडमेड वस्तू, मॅट रांगोळी, आर्ट, साड्यांचे विविध प्रकार, आयुर्वेदिक उत्पादने, विविध प्रकारचे पापड (ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ), विविध प्रकारचे कपडे अशा उत्पादनांचा समावेश आहे. इन्शुरन्स आणि सोलर पॅनलचे स्टॉल्सही येथे असतील. तसेच सर्व शासकीय योजनांची माहिती देणारा स्टॉलही इथे असेल. एवढेच नव्हे, तर खवय्यांना आपली रसनाही येथे तृप्त करता येणार आहे. कारण सोलकढी, उकडीचे मोदक, कोथिंबीर वडी यांसारख्या पदार्थांसह गरमगरम जेवणाचे स्टॉल्सही या प्रदर्शनात असतील.
स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. दर्जेदार स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीसाठी कुटुंबासह या ठिकाणी नक्की भेट द्यावी, असे आवाहन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे.
अमृतपेठ बाजारपेठेविषयी :
दिवस आणि वेळ : १४ व १५ मार्च २०२६ रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ
ठिकाण : हॉटेल द व्हाइट हाउस, कोहिनूर मॉलजवळ, 'द ड्राय फ्रूट'मागे, सावेडी, अहिल्यानगर
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228769 / 9766622274
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment